भारताचे महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी म्हटलं आहे की, त्यांना मोहम्मद सिराजचं (Mohmmed Siraj) वागणं खूप आवडतं. हा वेगवान गोलंदाज ज्या श्रेयाचा हकदार आहे, ते त्याला मिळत नाही. ओव्हल टेस्टच्या पाचव्या दिवशी सिराजने 104 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या आणि त्याच्याच जोरावर भारताने इंग्लंडला अवघ्या 6 धावांनी पराभूत करत पाच सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. इंग्लंडकडे सिराजच्या अचूक गोलंदाजीचं उत्तर नव्हतं. पाचव्या दिवशी त्याने केवळ 25 चेंडूंमध्ये 9 धावा देत 3 विकेट्स घेतल्या आणि इंग्लंडचा खालचा फळीचा डाव उध्वस्त केला.
सिराजने गस एटकिन्सनचा ऑफ स्टंप उडवत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. सचिन म्हणाले, अविश्वसनीय आणि शानदार कामगिरी. मला त्याचा एटीट्यूड खूप आवडतो. एक वेगवान गोलंदाज असा समोरासमोर येतो, हे कोणत्याही फलंदाजाला आवडणार नाही आणि शेवटच्या दिवशी त्याने जसा आत्मविश्वास दाखवला, तो शेवटपर्यंत कायम होता. कमेंटेटर्स म्हणताना ऐकलं की त्याने संपूर्ण मालिकेत 1,000 पेक्षा जास्त चेंडू टाकल्यानंतर शेवटच्या दिवशी जवळपास 90 मैल प्रती तास (145 किमी प्रती तास) वेगाने गोलंदाजी केली. हे त्याच्या हिंमतीचं आणि मोठ्या मनाचं उदाहरण आहे.
या मालिकेत सिराजने 32.43 च्या सरासरीने 23 विकेट्स घेतल्या आणि तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने संपूर्ण मालिकेत 1,113 चेंडू टाकले.
सचिन म्हणाले की, शेवटच्या दिवशी त्याने जशी सुरुवात केली, ती खूप कौतुकास्पद होती आणि जेव्हा जेव्हा संघाला त्याची गरज पडली, तेव्हा त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने नेहमीच दमदार गोलंदाजी केली. याच मालिकेतही त्याचं तसंच झालं. त्याने इतके बळी घेतले, तरी त्याला त्याच्या कामगिरीचं पूर्ण श्रेय मिळालेलं नाही, जे तो खऱ्या अर्थानं पात्र आहे.
ही संपूर्ण मालिका पाहता सिराज हा सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) वर्कलोड मॅनेजमेंटमुळे फक्त तीनच सामने खेळू शकला.
इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या त्या तीन सामन्यांत बुमराहने 14 विकेट्स घेतल्या, त्यात दोन वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.
सचिन यांनी बुमराहचं समर्थन करताना म्हटलं की, जे कसोटी सामने बुमराह खेळला नाही, ते सामने भारत जिंकला. हे निव्वळ योगायोग आहे. काही लोक या गोष्टीवर चर्चा करत आहेत, पण खरं सांगायचं तर तो एक योगायोग होता. बुमराहने मालिकेची सुरुवातच उत्तम केली पहिल्या कसोटी सामन्यात पाच विकेट्स घेतल्या. तो दुसरा सामना खेळला नाही. पण लॉर्ड्समध्ये, तिसऱ्या आणि चौथ्या डावात, त्याने पुन्हा पाच विकेट्स घेतल्या. म्हणजे त्याने जे तीन सामने खेळले, त्यात दोन सामन्यांत पाच विकेट्स घेतल्या.
तेंडुलकर म्हणाले, बुमराहचं प्रदर्शन जबरदस्त आहे. त्याने आतापर्यंत जे काही केलं आहे, ते अविश्वसनीय आहे. माझ्या मते, तो सातत्याने चांगलं प्रदर्शन करणारा खेळाडू आहे. मी त्याला इतर कुणापेक्षाही वर मानतो.





