इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघावर दहशतवादी संघटना हल्ला करण्याची भीती वर्तवली जात आहे. न्यूझीलंडच्या संघाला बॉम्बने उडवणार अशा धमक्या देखील दिल्या जात आहेत. तरीदेखील ठरलेल्या वेळापत्रकानुसार मंगळवारी (२१ सप्टेंबर) इंग्लंड महिला संघ आणि न्यूझीलंड महिला संघांमध्ये वनडे मालिकेतील तिसरा वनडे सामना पार पडणार आहे.
गुप्तचर संस्थांनी तपास केल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेटने हा धोका विश्वासार्ह नसल्याचे म्हटले आहे. तरीदेखील धोका टाळण्यासाठी तेथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी इंग्लंड आणि न्यूझीलंड बोर्डने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, सध्या न्यूझीलंड संघांच्या संघ व्यवस्थापकातील एका सदस्याला धमकी देण्यात आली होती की, ज्या हॉटेलमध्ये संघ थांबला आहे, त्या हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर संघ जेव्हा न्यूझीलंडला परतणार त्यावेळी देखील विमानात बॉम्ब ठेवला जाईल अशी धमकी देण्यात आली.
या भीतीमुळे सोमवारी (२० सप्टेंबर) न्यूझीलंड संघातील खेळाडू हॉटेलमध्येच बंद होते. यानंतर पोलिस आणि दहशतवादाशी संबंधित एजन्सींना बोलावण्यात आले होते. काही तासांसाठी तिसरा एकदिवसीय सामना रद्द होईल,से वाटत होते. कारण न्यूझीलंड संघाने सरावही केला नव्हता. परंतु असे झाले नाही.
इंग्लंडने देखील केला पाकिस्तान दौरा रद्द
काहीदिवसांपूर्वी न्यूझीलंडच्या पुरुष संघाचा पाकिस्तान दौरा रद्द झाला होता. त्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने देखील पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डला माहिती मिळाली होती की, त्यांच्या खेळाडूंवर दहशतवादी हल्ला होणार आहे, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता.
तसेच ईसीबीने याबाबत स्पष्टीकरण देत म्हटले की, “ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला होण्याची भीती वर्तवली जात आहे, अशा ठिकाणी खेळाडू दबावात येऊ शकतात. ते खेळाडू कोरोना आणि बायोबबलमुळे आधीच दबावात आहेत.”
वनडे मालिकेत इंग्लंडचा महिला संघ आघाडीवर
इंग्लंड महिला संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला संघ यांच्यात ५ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेत इंग्लंड संघाने २-० ची आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा वनडे सामना मंगळवारी (२१ सप्टेंबर) लिसेस्टरमध्ये, तर चौथा वनडे सामना २३ सप्टेंबर रोजी डर्बी आणि अंतिम वनडे सामना २६ सप्टेंबर रोजी कँटबरीमध्ये पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटनंतर आरसीबीचा कर्णधार कोण? ‘हे’ ३ खेळाडू आहेत प्रबळ दावेदार
मितालीच्या हेल्मेटवर लागला बाऊंसर आणि भारतीय चाहत्यांच्या काळजात झाले धस्स; पाहा व्हिडिओ






