देवजीत सैकिया यांची बीसीसीआयचे नवे सचिव म्हणून निवड झाली आहे. ते जय शाह यांची जागा घेतील. बीसीसीआयनं बोलावलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत साकिया यांची सचिवपदी नियुक्ती निश्चित करण्यात आली. त्यांच्याशिवाय प्रभतेज सिंग भाटिया यांची नवीन कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. साकिया आणि प्रभतेज यांना अनुक्रमे सचिव आणि कोषाध्यक्ष पदासाठी बिनविरोध नामांकन देण्यात आलं होतं. नामांकनानंतर दोघांचीही नियुक्ती निश्चित होती. यावर विशेष सर्वसाधारण सभेदरम्यान शिक्कमोर्तब करण्यात आलं.
आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर जय शाह यांनी 1 डिसेंबर रोजी बीसीसीआयच्या सचिवपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी घटनेतील त्यांच्या अधिकारांचा वापर करून देवजीत सैकिया यांना अंतरिम सचिवपद दिलं. बीसीसीआयमध्ये कोणतेही पद रिक्त झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत त्यावर नवीन नियुक्ती करणं बंधनकारक आहे.
सैकिया आता जय शाह यांच्या जागी बीसीसीआयचे नवीन सचिव बनले आहेत. तर प्रभतेज सिंग भाटिया यांनी आशिष शेलार यांची जागा घेतली. आशिष शेलार यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर बीसीसीआयचं कोषाध्यक्षपद सोडलं होतं. त्यांनी कोषाध्यक्ष म्हणून त्यांचे दोन कार्यकाळही पूर्ण केले होते.
नवीन सचिव देवजीत सैकिया यांचं पहिले काम बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्यासोबत टीम इंडियाच्या आढावा बैठकीत सहभागी होणं होतं. या आढावा बैठकीत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनीही भाग घेतला होता. सूत्रांनुसार, ही बैठक सुमारे 2 तास चालली. यामध्ये विशेषतः कसोटी सामन्यांमधील भारताच्या कामगिरीवर सखोल चर्चा झाली.
देवजीत सैकिया हे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहेत. ते मूळचे आसामचे आहेत. ते 1990 ते 1991 दरम्यान 4 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये यष्टिरक्षक म्हणून खेळले. या 4 सामन्यांमध्ये त्यांनी 53 धावा केल्या आणि 9 झेल घेतले आहेत.
हेही वाचा –
“त्याला आणखी थोडा वेळ द्या”, दिग्गज खेळाडूनं केला गौतम गंभीरचा बचाव
महाराष्ट्राच्या लेकीनं इतिहास रचला, महिला क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं!
टी20 मध्ये विराट-रोहितची जागा या खेळाडूंनी घेतली? पाहा आकडेवारी काय सांगते