बंगळुरु। भारतात सध्या विजय हजारे ट्रॉफी ही देशांतर्गत वनडे स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरी सर्वांचे लक्ष वेधले आहे. यातील एक खेळाडू म्हणजे कर्नाटकचा देवदत्त पडीक्कल. तो या स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याने रविवारी (२८ फेब्रुवारी) या स्पर्धेतील त्याचे तिसरे शतक ठोकले आहे.
पडीक्कल, समर्थच्या शतकाच्या जोरावर कर्नाटकचा १० विकेट्सने विजय
विजय हजारे ट्रॉफीमधील ‘गट सी’मध्ये रविवारी कर्नाटक विरुद्ध रेल्वे संघात सामना पार पडला. या सामन्यात रेल्वेने प्रथम फलंदाजी केली होती. त्यांच्याकडून प्रथम सिंगने १२९ धावांची शतकी खेळी केली. त्यामुळे त्यांना प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ९ बाद २८४ धावा करता आल्या आणि कर्नाटकला २८५ धावांचे आव्हान देता आले.
या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी कर्नाटककडून कर्णधार रवीकुमार समर्थ आणि देवदत्त पडीक्कल उतरले होते. या दोघांनी रेल्वेच्या गोलंदाजांना एकही यश मिळू दिले नाही. दोघांनी तब्बल २८५ धावांची नाबाद भागीदारी रचली आणि कर्नाटकला विजय मिळवून दिला.
यावेळी पडीक्कलने १२५ चेंडूत नाबाद १४५ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ९ चौकार आणि ९ षटकार खेचले. तसेच समर्थने ११८ चेंडूत नाबाद १३० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १७ चौकार ठोकले.
पड्डीकलचे तिसरे शतक
विजय हजारे स्पर्धा सुरु झाल्यापासून पडीक्कल अफलातून फॉर्ममध्ये आहे. त्याने गेल्या ५ सामन्यात ५० पेक्षा अधिक धावाच करेल्या आहेत. शिवाय गेल्या ३ सामन्यात त्याने सलग तीन शतके ठोकली आहेत. त्याने या स्पर्धेत उत्तरप्रदेश विरुद्ध ५२, बिहार विरुद्ध ९७ धावांची खेळी केल्या आहेत. तर ओडीसा, केरळ आणि रेल्वे या तीन संघांविरुद्ध अनुक्रमे १५२, नाबाद १२६ आणि नाबाद १४५ धावांची शतकी खेळी केली आहे.
त्यामुळे विजय हजारे ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामात त्याने ५ सामन्यात १९०. ६७ च्या सरासरीने तब्बल ५७२ धावा चोपल्या आहेत.
आयपीएलमध्ये बेंगलोर संघात आहे पडीक्कल
पडीक्कलचा हा खेळ पाहून सध्या इंडियन प्रीमीयर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ खुश होत असेल. कारण काही महिन्यांवरच आता १४ वा आयपीएल हंगात येऊन ठेपला आहे. असे असताना बेंगलोर संघाचा भाग असलेला पडीक्कल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे बेंगलोरला आशा असेल की पडीक्कलचा हा फॉर्म १४ व्या आयपीएलच्या हंगामातही कायम असेल.
आयपीएलच्या १३ व्या हंगामात चमकला होता पडीक्कल
पडीक्कलने युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात १५ सामन्यात ३१.५३ च्या सरासरीने ४७३ धावा केल्या होत्या. दरम्यान त्याने ५ अर्धशतकं ठोकली होती. तसेच तो या हंगामातील ‘इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर’ चा मानकरी देखील ठरला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटच्या शतकांचा दुष्काळ संपेना ! ‘इतके’ सामने झाले नाही उंचावली बॅट
भारताविरुद्धच्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद
‘विचार करतोय चौथ्या कसोटीसाठी खेळपट्टी कशी असेल?’ रोहितचा टीकाकारांना टोमणा