इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलग दोन विजय नोंदवून भारतीय संघाने २-१ अशी आघाडी घेतली आहे. अखेरच्या दोन कसोटी सामन्यात रोहित शर्माने उत्कृष्ट फलंदाजी केली आहे, परंतु कर्णधार विराट कोहली ज्या प्रकारच्या फलंदाजीसाठी ओळखला जातो, त्या प्रकारचे फलंदाजी त्याची सध्या होताना दिसत नाही. विराटने ३ कसोटी सामन्यात ३४ च्या सरासरीने केवळ १७२ धावा केल्या आहेत. त्यामध्ये एकाही शतकाचा समावेश नाही. विराटने आपल्या मागील ६ कसोटी आणि ११ डावांमध्ये शतक ठोकलेले नाही. हे त्याच्या कारकिर्दीतील दोन शतकादरम्यानचे सर्वाधिक अंतर आहे.
कोलकता येथे ठोकले अखेरचे कसोटी शतक
विराट कोहलीने नोव्हेंबर २०१९ मध्ये कोलकाता येथे बांगलादेशविरूद्ध कसोटी कारकीर्दीतील शेवटचे शतक केले होते. त्यानंतर त्याने न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले आहेत. तसेच, ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक तर इंग्लंडविरुद्ध तीन सामने खेळूनही त्याच्या बॅटमधून शतक आले नाही.
अकराव्या आणि बाराव्या शतकामध्ये होते इतके अंतर
विराटच्या अकराव्या आणि बाराव्या कसोटी शतकादरम्यान देखील सहा सामने आणि अकरा डावांचे अंतर होते. विराटने अकरावे शतक गॉल कसोटीत २०१५ साली ठोकलेले. त्यानंतर, वेस्ट इंडिजविरुद्ध नॉर्थ साऊंड येथे २०१६ मध्ये बारावे शतक आले.
वनडेमध्ये ही हीच परिस्थिती
विराट कोहलीच्या शतकाचा दुष्काळ फक्त कसोटी सामन्यातच चालला आहे असे नाही. वनडे सामन्यांमध्येही हीच परिस्थिती आहे. त्याने शेवटच्या १२ वनडे सामन्यात शतक झळकावले नाही. आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात त्याच्या शतकांची पाटी देखील कोरी आहे.
यादरम्यान ठोकली गेली ११७ शतके
विराटने २३ नोव्हेंबर २०१९ रोजी आपले अखेरचे आंतरराष्ट्रीय शतक केले. तेव्हापासून जगभरातील इतर फलंदाजांनी एकत्रित ११७ शतके केली आहेत. मार्नस लॅब्युशेन ५ शतकांसह आघाडीवर आहे. बाबर आझम, जो रूट, स्टीव्ह स्मिथ, पॉल स्टर्लिंग आणि केन विल्यमसन यांनी प्रत्येकी ४ शतके ठोकली आहेत. भारताच्या रोहित शर्मानेही ३ शतके आपल्या नावे केली. या कालावधीत अन्य भारतीय फलंदाजांमध्ये केएल राहुल दोन आणि रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांनी प्रत्येकी एक शतक ठोकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्धच्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद
‘विचार करतोय चौथ्या कसोटीसाठी खेळपट्टी कशी असेल?’ रोहितचा टीकाकारांना टोमणा
यंदाच्या वर्षात भारत, इंग्लंडच्या खेळाडूंचा कसोटीत दबदबा, पाहा दोन महिन्यातील संघांची कामगिरी