---Advertisement---

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर पड्डीकलची कमाल, ११ धावा करूनही केला खास विक्रम

On: मंगळवार, जानेवारी 26, 2021 6:15 PM
---Advertisement---

भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम टी२० स्पर्धा असणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना आजपासून (२६ जानेवारी) अहमदाबादच्या नव्याकोऱ्या मोटेरा स्टेडियमवर सुरुवात झाली. मैदानावरील या पहिल्याच सामन्यात कर्नाटकचा युवा फलंदाज देवदत्त पडीक्कल याने अवघ्या ११ धावा काढून देखील इतिहास रचला. देवदत्त मोटेराच्या या मैदानावर धाव घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

मोटेरा स्टेडियमवर पडीक्कलने घेतली पहिली धाव

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात कर्नाटक व पंजाब आमनेसामने आले होते. या मैदानावर हा पहिलाच स्पर्धात्मक सामना होता. यापूर्वी या मैदानावर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली व बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्या संघांदरम्यान एक मैत्रीपूर्ण सामना खेळला गेला होता. मात्र, स्पर्धात्मक क्रिकेटचा हा पहिलाच सामना या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. ज्यात पहिली धाव घेण्याचे भाग्य युवा पडीक्कलला लाभले.

या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्नाटकचा अवघ्या ८७ धावांत खुर्दा उडाला. कर्नाटककडून अनिरुद्ध जोशीने सर्वाधिक २७ धावा केल्या. पंजाबकडून सिद्धार्थ कौल, अर्षदीप सिंग व संदीप शर्मा यांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. प्रत्युत्तरात पंजाबचा सलामीवीर सिमरन सिंग याने नाबाद ४९ धावा आणि कर्णधार मनदिप सिंग याने नाबाद ३५ धावा केल्या. यासह पंजाबने ९ गड्यांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत जागा पटकावली.

पुढील महिन्यात खेळवला जाईल पहिला आंतरराष्ट्रीय सामना

मोटेरा स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळवला जाईल. हा सामना या मैदानावरील पहिला आंतरराष्ट्रीय सामना असेल. हा सामना दिवस रात्र स्वरूपात खेळवला जाईल. त्यानंतर मालिकेतील चौथा कसोटी सामना व पाच सामन्यांची टी२० मालिकादेखील याच मैदानावर खेळली जाईल.

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे मोटेरा

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. ६३ एकरात पसरलेले हे स्टेडियम पुन्हा उभारण्यासाठी सुमारे ७५० कोटी रुपये खर्च झाले. यामध्ये १ लाख १० हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मोटेरा मैदानामध्ये ११ खेळपट्ट्या, तीन सराव मैदाने आणि इनडोअर क्रिकेट अकादमी आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या मैदानावर पाऊस पडल्यानंतरही फारशी समस्या उद्भवणार नाही. पाऊस पडल्यानंतर पाणी काढण्यासाठी येथे एक आधुनिक प्रणाली बसवली आहे, जी केवळ एका तासात पुन्हा खेळासाठी मैदान सज्ज करू शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

हे माहिती असायलाच हवे! जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम भारताच्या ‘या’ शहरात, पाहा त्याची भव्यता 

‘या’ कारणामुळे कुलदीप ऐवजी सुंदरला दिली संघात जागा; अजिंक्य रहाणेने उलगडले रहस्य

“… तरच पृथ्वी शॉ करू शकेल भारतीय संघात पुनरागमन, इयान बिशप यांनी सांगितला पर्याय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---