टी२० विश्वचषक २०२१ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. मिशेल मार्श (नाबाद ७७) आणि डेविड वॉर्नर (५३) हे ऑस्ट्रेलियाचे विजयाचे नायक होते, ज्यांनी आपल्या स्फोटक खेळीने सामना एकतर्फी केला. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलिया संघाने हे लक्ष्य १८.५ षटकांत दोन गडी गमावून पूर्ण केले. ग्लेन मॅक्सवेल २८ धावांवर नाबाद राहिला. दरम्यान, वॉर्नरने एक खास विक्रम केला आहे.
डेविड वॉर्नरने एका टी२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आपले नाव कोरले आहे. तो या यादीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने यावर्षीच्या टी२० विश्वचषक स्पर्धेत २८९ धावा केल्या आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावर विराट कोहली आहे. त्याने २०१३ सालच्या टी२० विश्वचषक स्पर्धेत ३१९ धावा केल्या होत्या. दुसऱ्या स्थानी श्रीलंकेचा दिलशान आहे. त्याने २००९ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत ३१७ धावा केल्या होत्या.
तिसऱ्या स्थानी पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम आहे, त्याने २०२१ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत ३०३ धावा केल्या आहेत. चौथ्या स्थानी श्रीलंकेचा महेला जयवर्धने आहे. त्याने २०१० च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत ३०२ धावा केल्या होत्या, तर या यादीत पाचव्या स्थानी तमीम इक्बाल आहे. त्याने २०१६ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत २९५ धावा केल्या होत्या.
याशिवाय, डेविड वॉर्नर २०२१ या टी२० विश्वचषक स्पर्धेत बाबर आझमनंतर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
दरम्यान, रविवारी अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना न्यूझीलंडने ४ बाद १७२ धावा केल्या. केन विलियम्सनने ८५ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकांत २ गडी राखून लक्ष्य गाठले. मिशेल मार्शने ७७ धावांची शानदार खेळी केली. याशिवाय डेव्हिड वॉर्नरनेही ५३ धावा केल्या. टी२० विश्वचषक जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा सहावा देश ठरला आहे. याआधी वेस्ट इंडिज, भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका यांनी विजेतेपदावर कब्जा केला होता.
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार ऍरॉन फिंच अवघ्या ५ धावा करून ट्रेंट बोल्टने बाद झाला. १५ धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर मिशेल मार्श आणि डेविड वॉर्नर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. वॉर्नरने ३८ चेंडूत ५३ धावा केल्या. त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषक जिंकला, पण ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क ठरला सर्वात महागडा गोलंदाज, पाहा आकडेवारी