ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ चा अंतिम सामना रविवारी (१४ नोव्हेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंड संघाचा सात चेंडू आणि आठ गडी राखून पराभव केला आणि पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले. सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर चांगल्या लयीत दिसला. त्याने ३८ चेंडूत ५३ धावांची अर्धशतकी खेळी खेळली. आपल्या खेळीदरम्यान त्याने एक उत्कृष्ट षटकार ठोकला, ज्याची खूप चर्चा होतांना दिसत आहे.
अंतिम सामन्यादरम्यान वॉर्नरची स्फोटक शैली पाहायला मिळाली. त्याने आपल्या शानदार खेळीत चार चौकार आणि तीन उत्कृष्ट षटकार मारले. अंतिम सामन्यात त्याच्या बॅटमधून मारलेला एक षटकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. न्यूझीलंड संघासाठी पाचवे षटक आणणारा अनुभवी वेगवान गोलंदाज टिम साऊदीने आपल्या षटकातील पाचवा चेंडू लेग आणि मिडल स्टंपला लक्ष्य करत गुड लेंथवर टाकला. वॉर्नरने हा चेंडू जोरात मारला आणि तो थेट सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांच्या दिशेने गेला. चेंडू जमिनीवर पडण्यापूर्वी तिथे उपस्थित असलेल्या एका चाहत्याने जबरदस्त झेल टिपत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून प्रेक्षकाने पकडलेल्या या झेलचा व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये झेल पकडल्यानंतर फॅन मोठ्या उत्साहात दिसत होता. हा व्हिडिओ शेअर करताना आयसीसीने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सर प्रशंसा स्वीकारा.’
https://www.instagram.com/reel/CWSea7jFMYW/?utm_medium=copy_link
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करतांना न्यूझीलंडने ४ बाद १७२ धावा केल्या. न्यूझीलंडकडून केन विल्यमसनने सर्वाधिक ८५ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकांत ८ गडी राखून लक्ष्य गाठले. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार ऍरॉन फिंच अवघ्या ५ धावा करून माघारी परतला, त्याला ट्रेंट बोल्टने बाद केले. १५ धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर मिचेल मार्श आणि डेविड वॉर्नर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. मिचेल मार्शने ७७ धावांची शानदार खेळी केली. याशिवाय डेविड वॉर्नरनेही ५३ धावा केल्या. वॉर्नरने ३८ चेंडूत ५३ धावा केल्या. त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. मॅक्सवेलने २८ धावांची उपयुक्त खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
दुबई स्टेडियम, दुसऱ्यांदा फलंदाजी अन् विजेत्या संघाचे आहे खास कनेक्शन, ऑस्ट्रेलियालाही झाला फायदा
Video: विलियम्सनवर चढला पंतचा फिवर, टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये एका हाताने ठोकला षटकार