ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाच्या सुपर 12 (2022 T20 World Cup Super 12) फेरीला 22 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. मुख्य फेरीतील पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड (AUSvNZ) यांच्यादरम्यान सिडनी येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने शानदार खेळ दाखवत धावफलकावर 200 धावा लावल्या. संघाचा अनुभवी सलामीवीर डेवॉन कॉनवे (Devon Conway) याने अखेरपर्यंत नाबाद राहत 92 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने काही विक्रमांना देखील गवसणी घातली.
विश्वचषकाचे दावेदार म्हणून स्पर्धेत सहभागी झालेल्या न्यूझीलंडने धमाकेदार सुरुवात केली. युवा सलामीवीर फिन ऍलनने 16 चेंडूंवर 42 धावांची खेळी केली. केन विलियम्सन व ग्लेन फिलिप्स हे देखील उपयुक्त योगदान देत माघारी परतले. अखेरीस अष्टपैलू जिमी निशामने 13 चेंडूत 26 धावा चोपल्या. मात्र, सलामीवीर कॉनवेने 58 चेंडूंवर 7 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 92 धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंड 20 षटकात 3 बाद 200 धावा बनवण्यात यशस्वी ठरला.
आपल्या या खेळी दरम्यान कॉनवेने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील एका प्रमुख विक्रमाच्या यादीत स्थान मिळवले. आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेल्या देशांच्या खेळाडूंतर्फे सर्वात वेगवान 1000 टी20 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या कॉनवेने 29 सामन्यांच्या 26 डावांमध्ये हा पल्ला गाठला. त्याच्या नावे 57.68 च्या सरासरीने 1033 धावा जमा आहेत.
सर्वात कमी डावात 1000 टी20 धावा बनवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा डेव्हिड मलान पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने केवळ 24 डावात ही कामगिरी केली होती. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यानेही 26 डावातच हजारी टप्पा पूर्ण केलेला. तर, भारताचा विराट कोहली 27 डावांसह या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच व भारताचा उपकर्णधार केएल राहुल यांनी 100 धावा करण्यासाठी 29 डाव घेतलेले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘राशिद खान असेल इंग्लंडसाठी सर्वात मोठा धोका’, माजी कर्णधाराने आधीच केले सावध
मेलबर्नवरून आनंदाची बातमी, भारत-पाकिस्तान सामन्यावरील संकटाचे ढग दूर!






