ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात सध्या पहिल्या फेरीचे सामने खेळले जात आहेत. अ गटातील चार सामने पूर्ण झाले असून, नेदरलँड्स दोन विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यानंतर श्रीलंका व नामिबियाने प्रत्येकी एक विजय मिळवलाय. पहिल्या सामन्यात दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पुनरागमन केलेल्या श्रीलंकेला एकाच दिवशी दोन धक्के बसले. अनुभवी वेगवान गोलंदाज दुष्मंता चमिरानंतर प्रमुख फलंदाज धनुष्का गुणतिलका हा विश्वचषकातून बाहेर पडला आहे.
एका प्रमुख क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, धनुष्का गुणतिलका याला नामिबियाविरूद्धच्या सामन्यानंतर पाठीची समस्या निर्माण झाली होती. सुरुवातीला किरकोळ वाटणारी ही दुखापत गंभीर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गुणतिलका विश्वचषकात खेळू शकणार नाही. त्याच्या जागी युवा फलंदाज अशेन बंडारा याचा संघात समावेश केला गेला आहे.
युएईविरूद्धच्या सामन्यात मांडीचे स्नायू दुखावल्याने संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज दुष्मंता चमिरा हा संघातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी कसून रजिथा याची वर्णी लागलीये. तसेच संघाचा दुसरा वेगवान गोलंदाज प्रमोद मधुशान याचे देखील हॅमस्ट्रिंग दुखावले असून तो, कमीत कमी एक आठवडा खेळू शकणार नाही. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने खबरदारी म्हणून वेगवान गोलंदाज मथिश पथिराणा व असिथा फर्नांडो यांना ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीलंका संघाला विश्वचषकाच्या सुरुवातीलाच नवख्या नामिबियाने 55 धावांनी पराभूत केले होते. मात्र, त्यानंतर युएई विरूद्ध त्यांनी 79 धावांनी विजय मिळवला. नेदरलँड्सविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी करो अथवा मरो अशा पद्धतीचा असेल. या सामन्यात पराभूत झाल्यास श्रीलंकेला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जमलंय बघा! विराट कोहलीने केली ‘पुष्पा’मधील सुपरहिट ऍक्शन, व्हिडिओ जोरदार व्हायरल
दुख, दर्द, पीडा! विश्वचषक खेळण्यासाठी सोडली मोठी ऑफर, पाकिस्तान संघातूनही सानियाचा पती बाहेर