भारतीय संघाने नुकताच वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे व टी२० मालिकेत दणदणीत विजय साजरा केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या दोन्ही मालिकात पाहुण्या संघाला व्हाईट वॉश देत टी२० क्रमवारीत अव्वल स्थानही गाठले. यासोबतच भारतीय संघ व्यवस्थापनात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आगामी श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघात व्यवस्थापकाची भूमिका नवी व्यक्ती सांभाळताना दिसेल.
भारतीय संघाचे व्यवस्थापक बदलले
गेली दोन वर्ष भारतीय क्रिकेट संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहणारे गिरीश डोंगरे हे आता भारतीय संघासोबत नसतील. सुनील सुब्रमण्यम यांच्यानंतर २०१९ पासून ते व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. डोंगरे यांचा कार्यकाळ मागील वर्षी टी२० विश्वचषकानंतर संपुष्टात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्यांना अतिरिक्त कार्यभार दिला गेला होता. दक्षिण आफ्रिका दौ-यानंतर ते आपल्या पदावरून बाजूला झाले. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत जयदेव शहा यांनी अंतरिम व्यवस्थापक म्हणून भूमिका बजावली होती.
हे असतील नवे संघ व्यवस्थापक
गिरीश डोंगरे यांच्या जागी पूर्णवेळ संघ व्यवस्थापक म्हणून गुजरात क्रिकेट संघटनेत कार्यरत असलेल्या धवल शहा यांची वर्णी लागेल. ते अनेक वर्ष गुजरात क्रिकेट संघटनेत काम करत आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी ते संघाशी जोडले जातील.
अशी असेल श्रीलंकेविरुद्धची मालिका
भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध मायदेशात टी२० व वनडे मालिका खेळेल. तीन सामन्यांच्या टी२० मालिकेला लखनऊ येथे २४ फेब्रुवारीपासून सुरुवात होत मालिकेतील उर्वरित दोन सामने अनुक्रमे २६ व २७ फेब्रुवारी रोजी धर्मशाला येथे होतील. त्यानंतर उभय संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका होईल. मालिकेतील पहिला कसोटी सामना मोहाली येथे ४ ते ८ मार्च रोजी होईल. हा माजी कर्णधार विराट कोहलीच्या क्रिकेट कारकीर्दीतील १०० वा कसोटी सामना असेल. मालिकेतील दुसरा व अंतिम सामना बेंगलोर येथे १२ ते १६ मार्च दरम्यान होईल.
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघाकडून गोलंदाजी प्रशिक्षक बदलण्याची मागणी; ‘या’ दिग्गजाचे सुचविले नाव (mahasports.in)