शनिवारी(6 एप्रिल) आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईने 22 धावांनी विजय मिळवला. पण या सामन्यात नेहमी शांत असणारा चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी हा वेगवान गोलंदाज दीपक चहरवर भडकला होता. याबद्दल चहरने खूलासा केला आहे.
झाले असे की चेन्नईने दिलेल्या 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला 12 चेंडूत 39 धावांची गरज होती. यावेळी 19 व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी धोनीने चहरकडे चेंडू सोपवला.
परंतू चहरने पहिले दोन चेंडू स्लो बॉल टाकले. पण हे दोन्ही चेंडू नो बॉल टाकले. या दोन चेंडूवर पंजाबने 8 धावा काढल्या. त्यामुळे लगेचच धोनी चहरकडे आला आणि त्याच्याशी काही चर्चा केली.
MS Dhoni schooling Deepak Chahar for his back to back no balls #CSKvKXIP #IPL2019 pic.twitter.com/iRhGQ62gib
— Deepak Verma (@dpakwa) April 6, 2019
याबद्दल टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना चहर म्हणाला, ‘धोनी माझ्यावर खूप चिडला होता. मी केलेली ती मोठी चूक होती. त्याने खूप गोष्टी सांगितल्या. माझ्या मनामध्ये पुढे कोणता चेंडू टाकायचा हा विचार चालला होता.’
या नो बॉलनंतर मात्र चहरने भेदक गोलंदाजी करताना या षटकात एक विकेटही घेतली. त्यामुळे सामन्यानंतर धोनीने त्याचे कौतुक केले असल्याचेही चहरने स्पष्ट केले.
चहर म्हणाला, ‘सामन्यानंतर संघातील सर्व खेळाडू माझ्याकडे येऊन माझे अभिनंदन करत होते. ते म्हणाले मी शेवटी चांगली गोलंदाजी केली. धोनीही माझ्याकडे आला आणि हसून मला अलिंगन दिले. तसेच मला शबासकी दिली. मला माहित आहे मी ते दोन चेंडू वाईट टाकले, पण त्यानंतर मी लगेचच चांगले पुनरागमन केले.’
‘धोनीने मला प्रोत्साहन दिले आणि मला स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यास सांगितली. मी संघाच्या विजयात योगदान दिल्याचा मला आनंद आहे. ‘






