आयपीएल २०२१ मध्ये रविवारी (२६ सप्टेंबर) दोन सामने खेळले गेले. अबुधाबी येथे दिवसातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) व कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आमने सामने आले. केकेआरचा कर्णधार ओएन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. केकेआरच्या सर्व फलंदाजांनी उपयुक्त योगदान देत संघाला १७१ धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र, सामन्याच्या सुरुवातीला सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने टिपलेल्या एका झेलाची चांगलीच चर्चा झाली.
धोनीचा शानदार झेल मात्र…
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरच्या राहुल त्रिपाठी याने मागील सामन्यात प्रमाणेच उत्कृष्ट फलंदाजी सुरू ठेवली. मात्र, डावाच्या चौथ्या षटकात सीएसकेचा अष्टपैलू सेॅम करनचा पाचवा चेंडू अपर कट करण्याच्या नादात राहुलच्या बॅटची कड घेऊन वेगात चालला असताना यष्टीरक्षक धोनीने हवेत झेपावत एक सुरेख झेल घेतला. सीएसकचे सर्व खेळाडू आनंदोत्सव साजरा करत असतानाच, पंचांनी मात्र या जल्लोषात मिठाचा खडा टाकला.
मैदानी पंचांनी हा चेंडू फलंदाजाया उंचीपेक्षा अधिक आहे का ? याबाबत तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहून निर्णय फलंदाजाच्या पारड्यात टाकला. त्यामुळे राहुलला नाबाद घोषित करण्यात आले. धोनीने अप्रतिम कौशल्य दाखवून झेल टिपल्यानंतरही फलंदाज बाद न झाल्याने सर्वांची निराशा झाली.
ICYMI: A no-ball to rule out an MS special ☹️
Rahul Triptahi rode his luck and survived despite a
stunning Captain Cool effort 😊 #VIVOIPL #CSKvKKRWatch 🎥🔽https://t.co/v6woUSEIim
— IndianPremierLeague (@IPL) September 26, 2021
केकेआरची आव्हानात्मक धावसंख्या
प्रथम फलंदाजी करताना अबुधाबीच्या या मैदानावर केकेआरच्या सर्व फलंदाजांनी उपयुक्त योगदान दिले. राहुल त्रिपाठीने आपला शानदार फॉर्म कायम राखत ४५ धावांची खेळी केली. नितीश राणा व दिनेश कार्तिक यांनी अनुक्रमे ३७ व २६ धावांचे योगदान दिले. सीएसकेसाठी अष्टपैलू शार्दूल ठाकूर व जोश हेजलवूडने प्रत्येकी दोन बळी मिळवले. प्रत्युत्तरात चेन्नईने ११ षटकानंतर १ बाद १०३ धावा केल्या होत्या.