मागच्या आयपीएलच्या दोन हंगामांपासून एम एस धोनीच्या आयपीएलमधून निवृत्त होण्याच्या चर्चा खूप प्रमाणात होत आहेत. चाहत्यांना प्रत्येक वेळी वाटते की, धोनी हा हंगाम संपल्यानंतर आयपीएलमधून निवृत्ती घेईल, पण नंतर पुढच्या हंगामात तो खेळताना दिसतो. आयपीएल 2025 मध्ये सुद्धा एम एस धोनी चेन्नई सुपर किंग्स संघाचे कर्णधार पद भूषवत आहे. तत्पूर्वी आता धोनीच्या रिटायरमेंटबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, महेंद्रसिंग धोनी त्याच्या रिटायरमेंट वर काही महिन्यानंतर निर्णय घेऊ शकतो. पण म्हटले जात आहे की, संघात असे काही निर्णय आहेत जे लवकर घेणे अवघड आहे. ज्यामुळे सध्या महेंद्रसिंग धोनी संघातून बाहेर जाऊ शकत नाही. चेन्नईच्या संघात तरुण खेळाडूंना टिकण्यासाठी अनुभवी खेळाडूची गरज आहे. अशा परिस्थितीत महेंद्रसिंग धोनीच्या उपस्थितीत चेन्नईसाठी एक यष्टीरक्षक, फिनिशर आणि मार्गदर्शकाच्या रूपामध्ये त्याची खूप गरज आहे.
आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई संघाचे प्रदर्शन अत्यंत खराब राहिलं आहे. सुरुवातीच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड कर्णधार होता पण दुखापतीच्या कारणाने त्याला पूर्ण स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. यानंतर पुन्हा एकदा कर्णधार पद धोनीकडे सोपवण्यात आले. तरीसुद्धा संघात कोणताही सुधार पाहायला मिळाला नाही. आयपीएल 2025 मध्ये चेन्नईने एकूण 12 सामने आतापर्यंत खेळले आहेत. ज्यामध्ये 9 सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला आहे. फक्त 3 सामने त्यांनी जिंकले आहेत. चेन्नई सध्या प्लेऑफच्या रेस मधून बाहेर पडले आहे.
चेन्नई सुपर किंग्स संघाने धोनीच्या नेतृत्वात 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. 2023 मध्ये चेन्नई संघ शेवटचा चॅम्पियन ठरला होता. तेव्हा धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने गुजरातचा पराभव केला होता. मागच्या हंगामात देखील चेन्नई प्लेऑफ पर्यंत पोहोचली नव्हती.





