भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी ( MS Dhoni ) हा भारताचा आत्तापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहित शर्मा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, सुरेश रैना अशा अनेक खेळाडू धोनीच्या तालमीत तयार झाले. धोनीने पाठिंबा दिलेले अनेक खेळाडू मॅचविनर म्हणून समोर आले.
प्रत्येक कर्णधाराची संघास एका वेगळ्या उंचीवर नेण्यात महत्त्वाची भूमिका असते, परंतु बर्याच वेळा असे ऐकले जाते की काही खेळाडूंची कारकीर्द कर्णधार संपवतो किंवा वेळेआधीच त्यांना संघातून बाहेर केले जाते, या आरोपांतून धोनीचीदेखील सुटका होऊ शकली नाही.
धोनीच्या नेतृत्वात असे काही खेळाडू खेळले आहेत ज्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द अकाली संपली. या लेखात आपण भारताच्या ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ, ज्यांची क्रिकेट कारकीर्द धोनीमुळे संपली असे म्हटले जाते.
५. युवराज सिंग ( Yuvraj Singh )
भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टायलिश फलंदाज युवराज सिंग हा आपल्या काळातील सर्वात मोठा मॅचविनर खेळाडू होता. भारतीय क्रिकेटमध्ये युवराजची सिक्सर किंग म्हणून असलेली ओळख कधीही पुसली जाणार नाही. युवराजने धोनीच्या नेतृत्वात संघाला बरेच सामने जिंकवून दिले.
पण, युवराजच्या कारकीर्दीचा शेवट खूप निराशाजनक झाला. कारण, संघात पुनरागमनच्या प्रतीक्षेत असताना त्याला निवृत्ती घ्यावी लागली. खरं तर, जेव्हा कर्करोगाने लढाई जिंकल्यानंतर युवी धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या संघात परतला, तेव्हा त्याला पुरेशी संधी मिळू शकली नाही.
युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी धोनीने युवीची कारकीर्द लवकर संपविल्याचा आरोप अनेकदा केला होता. युवराजला धोनीमुळे अपेक्षित सामने मिळाले नाहीत, असा त्यांचा आणि अनेक चाहत्यांचा विश्वास आहे. युवीने २०१७ मध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन केले, पण त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आलं आणि त्याला पुन्हा संघात स्थान मिळालं नाही.
युवराज निवृत्तीआधी आयपीएलमध्ये शेवटचे मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएल खेळला. त्याचसोबत, त्याला शेवटचे दुबईमध्ये टी१० क्रिकेट खेळताना पाहिले गेले.
४. दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik )
भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने धोनीच्या आधी भारतीय संघामध्ये प्रवेश केला होता. कार्तिक एक चांगला फलंदाज होता तसेच त्याचे यष्टीरक्षणाचे कौशल्यही चांगले होते. पण, दिनेश कार्तिकला संपूर्ण कारकीर्दीत कधीच सातत्याने संधी मिळाली नाही.
दिनेश कार्तिक हा एक अतिशय बुद्धिमान खेळाडू म्हणून ओळखला जातो, परंतु धोनीने कार्तिकला पूर्ण पाठिंबा दिला नाही, असे आरोप करण्यात येतात. कार्तिक संघात संधीची वाट पाहत राहिला परंतु त्याला बऱ्याचवेळी रिकाम्या हाताने रहावे लागले.
वास्तविक, धोनी एक उत्तम यष्टीरक्षक आणि फिनिशर होता. त्यामुळे जेव्हा त्याला संधी मिळाली त्याने ती संधी दोन्ही हातांनी पकडली आणि त्यामुळे दुसऱ्या यष्टीरक्षकांसाठी संघात जागा बनवणे अवघड होत गेले. त्यामुळे दिनेश कार्तिकसारख्या सक्षम खेळाडूला पुरेशा संधी मिळू शकल्या नाहीत.
दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये कोलकत्ता नाइट रायडर्स संघाचे नेतृत्व करतो, तसेच भारतीय संघातही तो आत-बाहेर करत असतो.
३. हरभजन सिंग ( Harbhajan Singh)
एकेकाळी भारतीय क्रिकेट संघातील फिरकी गोलंदाजीचे सर्वात मोठे शस्त्र असलेल्या हरभजन सिंग याचे योगदान भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कोणीही विसरू शकणार नाही. आपल्या संपूर्ण कारकीर्दीत, हरभजन सिंगने भारतीय संघाला स्वत: च्या बळावर अनेक सामने जिंकवून दिले आहेत.
भज्जीने धोनीच्या नेतृत्वात विशेष यश संपादन केले. तो टी२० विश्वचषक २००७ आणि २०११ विश्वचषकात विजयी संघाचा सदस्य होता. परंतु, भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी ऑफस्पिनर गोलंदाज हरभजन सिंग सध्या संघाबाहेर आहे.
हरभजन सिंग गेल्या काही काळापासून आपल्या पुनरागमनाची वाट पहात होता. पण, तो भारतीय संघात परतू शकला नाही. आर अश्विनने तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवल्याने हरभजनसाठी संघात पुन्हा जागा मिळवणे अवघड झाले.
सध्या हरभजन फक्त आयपीएल खेळतो. तो धोनीच नेतृत्व करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांवेळी समालोचन करताना ही तो अनेकदा दिसून येतो.
२. गौतम गंभीर ( Gautam Gambhir )
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर गौतम गंभीर एकेकाळी संघाचा खूप महत्वाचा खेळाडू होता. २००७ मध्ये आयसीसी टी२० विश्वचषक आणि २०११ मध्ये आयसीसी विश्वचषक या दोन विश्वविजेतेपदे जिंकणार्या धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाकडून गंभीरने महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.
गंभीरला भारतीय संघाच्या विश्वचषक विजयाचा नायक म्हणून ओळखले जाते, पण त्यानंतर त्याची कारकीर्द खराब झाली. या दोन विश्वचषक विजयानंतर गौतम गंभीरला फारशी संधी दिली गेली नव्हती आणि हळूहळू त्याला संघातून वगळण्यात आले.
धोनीने गंभीरला संघातून वगळले तेव्हा तो फॉर्मात नव्हता यात शंका नाही, परंतु, त्यावेळी कर्णधार म्हणून पाठिंबा त्याला मिळाला असता तर तो पुन्हा एकदा संघात पुनरागमन करू शकला असता.
२०१८ मध्ये गंभीर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर तो सक्रिय राजकारणात सामील झाला. गंभीर सध्या दिल्लीतून खासदार आहे. या दरम्यान तो बऱ्याचदा धोनीवर टिका करताना दिसून आला आहे.
१. वीरेंद्र सेहवाग ( Virendra Sehwag )
भारताच्या सर्वात यशस्वी सलामीवीरांच्या यादीत वीरेंद्र सेहवागचे नाव अग्रस्थानी आहे. कसोटी क्रिकेटची व्याख्या बदलणारा विस्फोटक सलामीवीर सेहवागचे क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात विशेष नाव होते. सेहवाग हा केवळ भारतीय क्रिकेटच नव्हे तर जागतिक क्रिकेटमधील सर्वात धोकादायक सलामीवीर होता.
वीरूने संपूर्ण कारकिर्दीत आपल्या फलंदाजीच्या शैलीने भारतीय संघाला विशेष यश मिळवून दिले. कसोटीत भारताकडून दोन त्रिशतके ठोकणाऱ्या सेहवागच्या कारकिर्दीचा शेवट मात्र सुखद झाला नाही.
धोनीच्या कर्णधारपदाच्या यशात सेहवागचा मोठा वाटा होता. पण २०११ च्या विश्वचषकातील विजयानंतर धोनीने हळूहळू सेहवागला बाजूला केले, असा आरोप केला जातो. २०१३ नंतर त्याला कोणताही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. विश्वचषक २०१५ पर्यंत प्रतीक्षा केल्यानंतर सेहवागने निवृत्ती जाहीर केली.
निवृत्तीनंतर, सेहवागने वीरेंद्र सेहवाग इंटरनॅशनल स्कूलची स्थापना केली. सोबतच, तो समालोचक आणि क्रिकेट समीक्षक म्हणून काम करतो.
वाचनीय लेख –
ते चार खेळाडू ज्यांना डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षा उत्तम फलंदाज म्हटले जात
जगातील सर्वात दुर्दैवी १० क्रिकेटपटू, ज्यांना मैदानावरच गमवावा लागला प्राण
प्रतिस्पर्धी संघाने मिळून केलेल्या धावांपेक्षाही मोठी खेळी करणारे ५ क्रिकेटपटू