गुरुवारी (७ ऑक्टोबर) आयपीएल स्पर्धेत चाहत्यांना आणखी एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स दोन्ही संघ आमने सामने होते. चेन्नई सुपर किंग्स संघाने या सामन्यात पंजाब किंग्स संघाला १३७ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पंजाब किंग्स संघाने अवघ्या १३ षटकांत पूर्ण करत चेन्नई सुपर किंग्स संघाला पराभूत केले. या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाच्या ताफ्यात निराशेची लहर पसरली होती.
इतक्यात दीपक चाहरने त्याच्या प्रेयसीला प्रपोज करून हा दिवस खास बनवला, ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान ही प्लॅनिंग नक्की कोणी केली? याचा खुलासा दीपक चाहरच्या वडिलांनी केला आहे.
हा सामना झाल्यानंतर सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये परतले. त्यावेळी दीपक चाहर धावत स्टँड्समध्ये पोहोचला होता. त्याची प्रेयसी जया भारद्वाज देखील हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती. त्यावेळी संधी मिळताच दीपक चाहरने तिला प्रपोज केले आणि तिने हो देखील म्हटले. या सरप्राइज प्रपोजलच्या मागे एमएस धोनीचा हात होता, ज्याचा खुलासा दीपक चाहरच्या वडिलांनी केला आहे.
धोनीने केली होती प्लॅनिंग
दीपक चाहरचे वडील लोकेंद्र सिंग चाहर यांनी खुलासा करत म्हटले की, “दीपक चाहर त्याच्या प्रेयसीला प्रपोज करणार हे आधीपासून ठरले होते. परंतु त्याने प्लेऑफदरम्यान तिला प्रपोज करण्याची प्लॅनिंग केली होती. त्यावेळी एमएस धोनीने त्याला सांगितले की, तू साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात तिला प्रपोज कर.”
धोनीला आधीपासूनच माहीत होते
दीपक चाहर सामना झाल्यानंतर आपल्या प्रेयसीला प्रपोज करणार हे एमएस धोनीला आधीपासूनच माहीत होते. ठरल्याप्रमाणे दीपक चाहरने गुडघ्यावर बसून तिला अंगठी घातली, नंतर जया भारद्वाजने देखील त्याला अंगठी घातली. तसेच दीपक चाहरचे वडील पुढे म्हणाले की, “आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की, १८० देशातील लोकांनी माझ्या मुलाचा साखरपुडा लाईव्ह पाहिला. ते दोघेही यूएईवरून परतल्यानंतर लग्नाची प्लॅनिंग केली जाईल.” त्यानंतर टीम हॉटेलमध्येही या दोघांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी केक देखील कट करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या १४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एकावेळी भिडणार ४ संघ, असे पाहता येतील सामने
टी२० विश्वचषकात दुखापतग्रस्त चक्रवर्तीचा रिप्लेसमेंट कोण? ‘या’ २ नावांची होतेय भरपूर चर्चा
गोलमाल है भाई…! एकीकडे पटापट विकेट्स जात असताना राजस्थानच्या ताफ्यात सुरू होता भलताच गोंधळ