जगभरात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतासह अनेक देश या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. रोज लाखो लोकांना या रोगाची लागण होत आहे. अशातच बुधवारी (२१ एप्रिल) सकाळी वृत्त आले की भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या आई-वडीलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आज (२२ एप्रिल) त्यांच्या आरोग्याबाबत हॉस्पिटल प्रशासनाने माहिती दिली.
बुधवारी आली होती संक्रमणाची बातमी
माध्यमांतील अहवालानुसार, धोनीचे वडील पान सिंग धोनी आणि आई देवकी देवी यांना कोविड-१९ चे संक्रमण झाले आहे. त्यानंतर त्यांना रांचीमधील बरियातू रोड स्थित पल्स हॉस्पिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. हे वृत्त समजताच भारतातून धोनीच्या चाहत्यांकडून त्याचे आई-वडील लवकर बरे व्हावेत अशा शुभेच्छा येत आहेत.
हॉस्पिटल प्रशासनाकडून आली माहिती
धोनीचा आई-वडिलांची तब्येत कशी आहे याविषयी पल्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी माध्यमांना बातमी दिली. त्यांच्यानुसार,
“धोनीचा आई-वडिलांची स्थिती सध्या सामान्य आहे. दोघांच्या ऑक्सिजनची पातळी आता वाढली असून हे संक्रमण त्यांच्या फुप्फुसांना झाले नव्हते. पुढील काही दिवसांत दोघेही संक्रमणमुक्त आणि बरे होतील.”
धोनीची पत्नी साक्षी आणि चेन्नई सुपर किंग्सचा प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी देखील या दोघांच्या प्रकृतीविषयी याआधी माहिती दिली होती.
साक्षीने सांगितले होते की त्यांची तब्येत स्थिर आहे. तसेच फ्लेमिंग यांनीही माहिती दिली होती की परिस्थिती आटोक्यात असून धोनीला चेन्नई सुपर किंग्स व्यवस्थापनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल.
धोनी खेळतोय आयपीएल
एमएस धोनी हा मागील महिन्यापासून इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्स संघासोबत आहे. तसेच सध्या चेन्नई सुपर किंग्सचे सामने मुंबईत सुरु असल्याने तोही मुंबईत आहे. तसेच तो जरी मुंबईत असला तरी साक्षी आणि त्याची मुलगी झिवा त्याच्यासह मुंबईत आहेत की त्यांच्या घरी रांचीमध्ये आहेत, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
चेन्नई सुपर किंग्सने आपले पहिल्या चार पैकी तीन सामने जिंकत गुणतालिकेत प्रथम स्थान पटकावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रेकॉर्ड अलर्ट! मुंबई इंडियन्स नंतर ‘अशी’ कामगिरी केवळ दुसरा संघ बनला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
अखेर हास्य फुलले!! हैदराबादच्या विजयाच्या क्षणी मालकीण काव्या मारन झाली भावूक, व्हिडिओ होतोय व्हायरल
ब्रेकिंग! हैदराबादला मोठा धक्का; टी नटराजन उर्वरित आयपीएल २०२१ हंगामामधून बाहेर