पुढील वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मेगा लिलावापूर्वी 10 फ्रँचायझींनी गुरुवारी अंतिम मुदतीवर त्यांच्या रिटेन खेळाडूंच्या यादी जाहीर केल्या. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) सारख्या काही संघांनी सर्व सहा जागांवर खेळाडू रिटेन केले. यानंतर होणाऱ्या मेगा लिलावात राईट टू मॅच (RTM) कार्ड काही संघ वापरताना दिसतील.
त्यानंतर पंजाब किंग्स (PBKS) संघ फक्त दोन अनकॅप्ड खेळाडू प्रभसिमरन सिंग आणि शशांक सिंग यांना रिटेन केल्यानंतर सर्वात मोठ्या रकमेसह लिलावात प्रवेश करेल. स्पर्धेच्या 18 व्या हंगामापूर्वी संपूर्ण फेरबदल करण्याचा फ्रँचायझीचा इरादा दिसून येतो. त्याचवेळी असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना या रिटेन्शनने जबरदस्त फायदा झाला. मागील हंगामात अवघ्या काही लाखात खेळलेल्या खेळाडूंना आता कोट्यावधी रुपये मिळाले आहेत.
राजस्थान रॉयल्सने आपला युवा यष्टीरक्षक ध्रुव जुरेल याला 14 कोटी रुपये देत रिटेन केल्यानंतर, तो अधिकृतरित्या सर्वाधिक फायदा झालेला खेळाडू ठरला. 2023 मध्ये जुरेलला त्याच्या 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेण्यात आले होते. दुबईमध्ये गेल्या वर्षीच्या मिनी लिलावापूर्वी त्याच किमतीवर कायम ठेवले गेलेले. त्यामुळे त्याच्या पगारात तब्बल 6900 टक्के वाढ झाली.
या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या मथिशा पथिराना याला देखील मोठा फायदा झाला. मागील दोन हंगामात चेन्नईसाठी केवळ 20 लाखात खेळत असलेल्या पथिरानाला तब्बल 13 कोटी रुपये देत चेन्नईने कायम केले. त्याच्या पगारात यामुळे 6400 टक्क्यांची घसघशीत वाढ झाली.
मागील दोन हंगामात आरसीबीसाठी प्रमुख फलंदाज म्हणून पुढे आलेल्या रजत पाटीदार याला केवळ 20 लाख रुपये इतकी रक्कम मिळत होती. मात्र, यावेळी त्याला आरसीबीने रिटेन करताना 11 कोटी रुपये दिले. त्याच्याबरोबरच लखनऊ सुपरजायंट्सचा युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव याला देखील मागील तीन हंगामात फक्त 20 लाख रुपये मिळत होते. परंतु, त्याला देखील अकरा कोटींची तगडी किंमत मिळाली आहे. या दोघांच्या पगारात यामुळे 5400 टक्क्यांची वाढ झाल्याची दिसून येत आहे.
हेही वाचा –
रिटेंशनमध्ये कोहलीच्या आवडत्या सिराजवर का भारी पडला यश दयाल? जाणून घ्या आतली कहाणी
“कोणीतरी लवकरच पिवळी जर्सी घालेल”, सीएसकेच्या माजी खेळाडूने पंतबाबत दिले मोठे संकेत
मुंबई कसोटीचा पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावे, अखेरच्या सत्रात टीम इंडियाची घसरगुंडी!