इंग्लंडविरुद्ध घरच्या मालिकेत झालेल्या खराब कामगिरीमुळे श्रेयस अय्यरला (Shreyas iyer) कसोटी संघातून बाहेर बसवण्यात आलं होतं. त्यानंतर अय्यरने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात धावा केल्या. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची निवड होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन करण्यासाठी अय्यरला दुलीप ट्रॉफीत (Dulip Trophy) चमक दाखवणं महत्त्वाचं होतं. पण पहिल्या डावात तो अपयशी ठरला. त्यामुळे घरबसल्या दुसऱ्या खेळाडूचं काम चांगलं झालं.
दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात वेस्ट झोन आणि सेंट्रल झोन आमनेसामने आले. वेस्ट झोनचा कर्णधार शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) वगळता बाकी सर्व फलंदाज अपयशी ठरले. पण सर्वाधिक निराशा यशस्वी जयस्वाल (Yashavi jaiswal) आणि श्रेयस अय्यर (Shreyas iyer) यांनी दिली. जयस्वाल फक्त 4 धावा करून माघारी परतला, तर अय्यरने 28 चेंडूत 25 धावा केल्या. खलील अहमदने (Khaleel Ahmed) या दोन्ही फलंदाजांना बाद केलं. मात्र जयस्वाल आधीच संघाचा भाग असल्यामुळे त्याला पुन्हा संधी मिळणारच आहे. पण अय्यरची अडचण मात्र वाढली आहे.
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीत (Anderson Tendulkar Trophy) करुण नायरला (Karun Nair) संघात स्थान मिळालं होतं. मात्र त्याने त्याचा काहीही फायदा करून घेतला नाही. त्यामुळे अशी अपेक्षा होती की, जर अय्यरने दुलीप ट्रॉफीत फलंदाजीने चमत्कार केला असता, तर त्याला करुणच्या जागी संघात घेतलं गेलं असतं. पण अय्यर अपयशी ठरल्यामुळे आता करुण नायरला टीम इंडियात आणखी एक संधी दिली जाऊ शकते. सध्या नायर रणजी ट्रॉफीची वाट पाहत आहे. तर दुसऱ्या डावात अय्यर चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्न करेल.






