भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक हा सध्या नव्या क्षेत्रात धमाकेदार फलंदाजी करत आहे. तो सध्या क्रिकेट सामन्यांचा समालोचक बनला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याद्वारे त्याने समालोचन क्षेत्रात पदार्पण केले होते. आता सध्या तो इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत समालोचन करताना दिसून येत आहे.
दरम्यान त्याचे एक विधान सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. या विधानामुळे कार्तिक चाहत्यांकडून ट्रोल झालाच पण त्याला त्याची पत्नी आणि आईचेही बोलणे ऐकावे लागले आहे.
त्याचे झाले असे की, दिनेश इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडेत समालोचन करत होता. यावेळी त्याने फलंदाजाच्या बॅटबद्दल प्रतिक्रिया देत म्हटले की, ‘अधिकतर फलंदाजांना त्यांची बॅट आवडत नाही. त्यांना दुसऱ्यांची बॅट जास्त आवडते. अर्थातच बॅट ही अगदी शेजाराच्या पत्नीसारखी असते. ती नेहमीच आपल्याला आवडत असते.’
त्याच्या या विधानावरुन नेटिझन्सनी त्याला जोरदार ट्रोल केले. अनेकांनी त्याची पहिली पत्नी निकीताच्या नावावरुन त्याच्यावर निशाणा साधला. त्यामुळे अखेर त्याने सर्वांची क्षमा मागितली.
इंग्लंड-श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वनडेदरम्यान ऑन एयर तो म्हणाला की, ‘मी यापुर्वी जे विधान म्हटले होते. त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो. माझा अजिबात असे काही म्हणण्याचा हेतू नव्हता. ते चुकून तसे झाले. खरच माझे विधान चुकीचे होते. यासाठी मला माझी पत्नी आणि आईनेही खूप बोलणे ऐकवले आहे. घडल्या प्रकरणी मी सर्वांचा क्षमस्व आहे.’
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्याला’ श्रीलंकाविरुद्ध ६ पैकी ६ सामन्यात खेळताना पाहायचंय; बड्या भारतीय क्रिकेटपटूची इच्छा
जेव्हा जडेजा अन् रैनामध्ये झाले होते कडाक्याचे भांडण, ‘असा’ मिटला होता वाद
ग्रेट भेट! लग्नाच्या वाढदिवशी धोनी फॅमिलीच्या घरी ‘नव्या पाहुणी’चे आगमन, तुम्हीही घ्या पाहून





