---Advertisement---

तामिळनाडूने विजेतेपद पटकावताच दिनेश कार्तिक भावूक, ट्विट करत दोन वर्षांपूर्वी आठवणींना दिला उजाळा

---Advertisement---

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी (२२ नोव्हेंबर) पार पडला. या सामन्यात कर्नाटक आणि तामिळनाडू हे स्पर्धेतील बलाढ्य संघ आमने-सामने होते. या सामन्यात तामिळनाडू संघाला जेतेपद मिळवण्यासाठी शेवटच्या चेंडूवर ५ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी शाहरुख खानने लेग साईडच्या दिशेने गगनचुंबी षटकार मारला आणि संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच भारतीय संघाचा दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने देखील २ वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत, त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तामिळनाडू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्नाटक संघाकडून प्रथम फलंदाजी करताना अभिनव मनोहरने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली, तर प्रवीण दुबेने ३३ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर कर्नाटक संघाला ७ बाद १५१ धावा करण्यात यश आले होते.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या तामिळनाडू संघाकडून नवनीत जगदिशनने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. तर शाहरुख खानने ३३ धावांचे योगदान देत तामिळनाडू संघाला सामना जिंकून दिला.

या विजयानंतर सर्वत्र जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच दिनेश कार्तिकने एक ट्विट केले आणि २ वर्षांपूर्वी झालेल्या सामन्यातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याने लिहिले की “२ वर्षांपूर्वी आम्हाला अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर पराभवाचा सामना करावा लागला होता. आता त्याच संघाविरुद्ध विजय मिळवणे ते ही शेवटच्या चेंडूवर, हे खरंच अद्भुत आहे. कर्नाटक संघाने संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आणि तामिळनाडू संघाचे अभिनंदन.”

https://twitter.com/DineshKarthik/status/1462725340053180417?t=0C5IzAWLEh5LJfPbXqFpWQ&s=19

दिनेश कार्तिकने २०१९ मध्ये झालेल्या सामन्याचा उल्लेख केला आहे. या सामन्यात कर्नाटक संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर १८० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना तामिळनाडू संघाला अवघ्या १७९ धावा करण्यात यश आले होते. केवळ १ धावेने तामिळनाडू संघाचा पराभव झाला होता. १८१ धावांचा पाठलाग करत असताना पाचव्या चेंडूवर विजय शंकर बाद होऊन माघारी परतला होता. त्यानंतर मुरगन अश्विनला शेवटच्या चेंडूवर ३ धावा काढायच्या होत्या. परंतु, त्याला एकच धाव काढता आली. ज्यामुळे तामिळनाडू संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटीत युवा शुबमन गिलला मिळणार नवी जबाबदारी?

“बेबी क्या कर रहे हो?” शिखर धवनचा मजेशीर व्हिडिओ पाहून हसून हसून व्हाल लोट पोट

काय सांगता!! कुत्रा करतोय यष्टीरक्षण आणि क्षेत्ररक्षण, खुद्द मास्टर-ब्लास्टरने शेअर केलाय व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---