कोलंबो। भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताचे निदाहास ट्रॉफीचे विजेतेपद निश्चित केले. रोमांचकारी झालेल्या या सामन्यात भारताने बांग्लादेशवर ४ विकेट्सने मात केली.
बांग्लादेशने भारतासमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली होती. पण चांगल्या सुरुवातीनंतरही शिखर धवन(१०) लवकर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ लगेचच सुरेश रैनाही शून्य धावेवर बाद झाला.
या दोन विकेट्स लवकर गेल्यानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुलने भारताचा डाव संभाय्ण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात राहुलनेही(२४) आपली विकेट गमावली. त्यामुळे मनीष पांडे आणि रोहितवर फलंदाजीची जबाबदारी आली.
रोहितने चांगला खेळ करत अर्धशतक केले. त्याने ४२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ५६ धावा केल्या. हे त्याचे आंतराष्ट्रीय टी २० मध्ये १४ वे अर्धशतक आहे. तसेच त्याने आज ट्वेन्टी२० मध्ये ७००० धावांचा टप्पाही पार केला.
मात्र रोहित आणि मनीष(२८) बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिकने भारताच्या फलंदाजीची जबाबदारी घेत आक्रमक खेळ केला. तो जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा भारताला १२ चेंडूत ३४ धावांची गरज होती.
त्याने विजय शंकरला हाताशी घेत ३ षटकार आणि २ चौकारांसह ८ चेंडूत नाबाद २९ धावा केल्या. मात्र शंकर(१७) शेवटच्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर बाद झाला. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी १ चेंडू ५ धावा असे समीकरण उभे राहिले. या चेंडूवर कार्तिकने षटकार खेचून भारताला विजय मिळवून दिला.
बांग्लादेशकडून रुबेल हुसेन(३५/२), शाकिब अल हसन(२८/१), नाझमुल इस्लाम अपू (३२/१), मुस्तफिझूर रहमान(२१/१) आणि सौम्य सरकार (३३/१) यांनी विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १६६ धावा केल्या. भारतीय गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरने बांगलादेशचा सलामीवीर फलंदाज लिटोन दासला(११) बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले.
त्यानंतर चहलच्या गोलंदाजीपुढे बांग्लादेश फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्याने नियमित कालांतराने बांग्लादेशच्या तीन फलंदाजांना बाद केले. त्यामुळे बांग्लादेशची अवस्था ४ बाद ६८ धावा अशी झाली.
त्यानंतरही रहमानने त्याचा खेळ चालू ठेवला होता. पण त्याला बाकी फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. त्याने ५० चेंडूत ७७ धावांची खेळी केली. यात त्याने ७ चौकार आणि ४ षटकार मारले. अखेर त्याला जयदेव उनाडकटने त्रिफळाचित करून बाद केले.
बांग्लादेशकडून तमिम इक्बाल(१५), सौम्या सरकार(१), मुशफिकूर रहीम(९), महमुदूल्लाह रीयाद(२१), शाकिब अल हसन(७), मेहेदी हसन(१७*), रूबेल हुसेन(०) आणि मुस्तफिजूर रहमान(०) यांनी धावा केल्या.
भारताकडून युजवेंद्र चहल(१८/३), जयदेव उनाडकट(३३/२) आणि वॉशिंग्टन सुंदर(२०/१) यांनी विकेट्स घेतल्या.






