यष्टीरक्षक रिषभ पंतनं डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या भीषण कार अपघातानंतर बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत पुनरागमन केलं. पंतनं कमबॅकच्या आपल्या पहिल्याच सामन्यात शानदार शतक झळकावलं. पंतच्या अनुपस्थितीत भारतीय कसोटी संघ अपूर्ण दिसत होता, जो आता पूर्ण झालेला दिसत आहे. बांगलादेशविरुद्धच्या चेन्नईत कसोटीत शतक झळकावल्यानंतर पंत चर्चेचा विषय बनला आहे. आता भारताची माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकनं पंत आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यातील तुलनेवर मोठं विधान केलं.
रिषभ पंत आणि एमएस धोनी यांच्या तुलनेवर कार्तिक म्हणाला की, ज्यानं केवळ 34 कसोटी सामने खेळले, त्याला महान म्हणणं योग्य नाही. ‘क्रिकबझ’वर बोलताना कार्तिक म्हणाला की पंत आणि धोनीची आताच तुलना करणं योग्य नाही. कार्तिक म्हणाला, “तो (पंत) केवळ 34 कसोटी सामने खेळलाय. त्यामुळे तो आताच भारताचा महान यष्टिरक्षक आहे, असं म्हणणं बरोबर नाही. आपण थोडा वेळ घेऊ आणि मग या निर्णयावर पोहचू. मात्र निश्चितच तो भारताचा महान यष्टीरक्षक फलंदाज म्हणून आपली कारकीर्द संपवेल.”
कार्तिक पुढे म्हणाला, “यष्टीरक्षक म्हणून धोनीला कमी लेखू नका. त्यानं केवळ शानदार किपिंगच केली नाही, तर जेव्हा भारताला आवश्यकता होती तेव्हा त्यानं फलंदाजी केली आणि धावाही केल्या. त्यानं भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची गदा जिंकण्यास मदत केली. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या खेळाडूबद्दल बोलता तेव्हा तुम्हाला हे सर्व विचारात घ्यावं लागेल.”
रिषभ पंतनं आतापर्यंत 34 कसोटी सामने खेळले. याच्या 58 डावांमध्ये त्यानं 44.79 च्या सरासरीनं 2419 धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्यानं 6 शतकं आणि 11 अर्धशतकं झळकावली. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 159 आहे. पंत सध्या भारतीय कसोटी संघाचा मुख्य यष्टिरक्षक फलंदाज आहे.
हेही वाचा
तसाच रनअप, तशीच ॲक्शन; जगाला मिळाला दुसरा शोएब अख्तर! VIDEO
VIDEO: क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र रनआऊट, व्हिडिओ पाहूनही विश्वास बसणार नाही!
श्रीलंकेचा जागतिक क्रिकेटमध्ये कमबॅक, पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला धुतलं!