बऱ्याच कालावधीनंतर आजी-माजी क्रिकेटपटूंसोबत झालेल्या जुन्या प्रसंगाचा त्यांच्या संघ सहाकारी किंवा प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंकडून उलगडा होत असतो. अनेकजण त्यांच्या चांगल्या गोष्टींचा खुलासा करतात; तर काहीजण टीकाही करतात. आज आपला ३६ वा वाढदिवस साजरा करत असलेल्या यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यानेही एक रोमांचक खुलासा केला आहे. क्रिकेटविश्वात ‘हिटमॅन’ नावाने प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्मा याच्यासोबतच्या एका प्रसंगाची आठवण त्याने सांगितली आहे.
जवळपास १४ वर्षांपुर्वी म्हणजे २०१७ सालच्या टी२० विश्वचषकावेळी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात किंग्जमीड, डर्बन येथे एक सामना झाला होता. हा सामना रोहितसाठी अविस्मरणीय ठरला होता. याच सामन्यात त्याने ताबडतोब फलंदाजी करताना आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले होते. ४० चेंडूत २ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने त्याने नाबाद ५० धावा चोपल्या होत्या. यावेळी तत्कालिन कर्णधार एमएस धोनी याच्यासोबत मिळून त्याने ८५ धावांची भागिदारीही साकारली होती.
परंतु रोहितने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे पहिलेवहिले अर्धशतक स्वत:च्या नव्हे तर कार्तिकच्या बॅटने केले होते. स्वत: कार्तिकने याबद्दल उलगडा केला आहे. ‘ब्रेकफास्ट विद चॅम्पियन्स शो’मध्ये गौरव कपूरसोबत बोलताना कार्तिक म्हणाला की, “रोहितने त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक माझ्या बॅटने केले होते. मला त्याचा खूप अभिमान आहे.”
“सुरुवातीला मी त्याच बॅटने फलंदाजी करत होतो. मग मी मैदानावर असलेल्या रोहितला म्हटले, ही बॅट खूप खराब आहे. यावर रोहित म्हणाला की, जर तुला ती बॅट आवडत नसेल तर मला दे आणि मी माझी बॅट त्याला दिली. त्यादिवशी रोहितने अद्भुत खेळी केली होती. परंतु त्याच्या खेळीचे श्रेय माझ्या बॅटला नव्हे तर फलंदाजाला अर्थातच रोहितला जाते. तो प्रसंग मला चांगलाच आठवण आहे. रोहितने माझ्या बॅटने त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक करणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे,” असे कार्तिकने पुढे बोलताना सांगितले.
या पहिल्या अर्धशतकानंतर पुढे रोहितने धावांचा रतीब घातला. या ३४ वर्षीय फलंदाजाने आतापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये १११ सामने खेळताना २४६८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४ शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच वनडे आणि कसोटीतही त्याची फलंदाजी कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. त्याने कसोटीत ७ शतके आणि एक द्विशतक केले आहे. तर वनडेत ३ द्विशतके आणि २९ शतके झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितले, शुबमन गिलचा ‘तो’ शॉट त्याच्या फलंदाजीतील मोठी कमजोरी
ENGvsNZ: कसोटी मालिका तोंडावर असताना इंग्लंडला मोठा धक्का, कर्णधार सराव सत्रात दुखापतग्रस्त