श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताला 0-2 ने पराभवाचा सामना करावा लागला. यासह 27 वर्षांची भारताची विजयी मालिकाही संपुष्टात आली. या मालिकेत टीम इंडियाची फलंदाजी पराभवाला कारणीभूत ठरली. श्रीलंकेविरुद्ध कर्णधार रोहित शर्माशिवाय इतर फलंदाजांची कामगिरी खास राहिली नाही. ‘रनमशीन’ विराट कोहलीचाही भारतीय वनडे संघात समावेश करण्यात आला होता, परंतु संपूर्ण मालिकेत त्याची बॅट शांत दिसली. थोडक्यात श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका सरासरीच्या दृष्टीने विराटची सर्वात वाईट मालिका होती. अशातच आता विराटचा माजी सहकारी आणि माजी भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने विराटच्या खराब फॉर्ममागचे कारण सांगितले आहे.
आयसीसी टी20 विश्वचषक 2024 नंतर जवळपास एक ते दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून विराटने क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले. मात्र श्रीलंकेच्या फिरकीपटूंपुढे तो धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसला आणि तिन्ही सामन्यांमध्ये कोहली पायचीत बाद झाला. या अनुभवी फलंदाजाने तीन सामन्यात एकही अर्धशतक झळकावले नाही आणि तीन डावात 19.33 च्या सरासरीने केवळ 58 धावा केल्या. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 24 धावा होती. फलंदाजीतील या खराब कामगिरीमुळे कोहलीवर बरीच टीका होत आहे.
मात्र, आता माजी भारतीय खेळाडू दिनेश कार्तिकने सांगितले की, कोहलीसह इतर सर्व भारतीय फलंदाजांना श्रीलंकेत अडचणींचा सामना करावा लागला. यष्टिरक्षक फलंदाजाने सांगितले की, तो विराट कोहलीचा बचाव करत नाही, परंतु काहीवेळा श्रीलंकेत फलंदाजांसाठी परिस्थिती खूप कठीण होते.
क्रिकबझ वरील ‘HeyCB with DK’ च्या 9व्या एपिसोडमध्ये, दिनेश कार्तिकने श्रीलंकेच्या भारत दौऱ्याबद्दल भाष्य केले. दिनेश कार्तिक म्हणाला, “सर्वप्रथम आपण कबूल केले पाहिजे की या मालिकेत फिरकीपटूंना खेळणे कठीण होते. विराट कोहली असो, रोहित शर्मा किंवा इतर कोणीही, 8 ते 30 षटकांच्या दरम्यान हलक्या नवीन चेंडूने या खेळपट्टीवर खेळणे सोपे नव्हते. तुम्हाला अशा जास्त खेळपट्ट्या सापडणार नाहीत. परंतु मी येथे विराट कोहलीचा बचाव करत नाहीये. असे म्हणू शकतो की येथे फिरकीपटूंविरोधात खेळणे खूप कठीण होते.”
हेही वाचा –
सुरेश रैना पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, ‘या’ टी20 लीगमध्ये मिळाली खास जबाबदारी
धाडसी फलंदाज, भारताच्या मधल्या फळीचा कणा! 1983 वर्ल्डकप विजयाच्या हिरोचा आज वाढदिवस
काय सांगता! धोनीनं केली 15 कोटी रुपयांची फसवणूक? बीसीसीआयनं उत्तर मागितलं