भारतीय संघाला निदाहास ट्रॉफी स्पर्धेत षटकार मारून विजय मिळवून देणाऱ्या दिनेश कार्तिकने (Dinesh karthik) पुन्हा एकदा सरावाला सुरुवात केली आहे. २०१९ वनडे विश्वचषक स्पर्धेनंतर त्याला भारतीय संघाची जर्सी घालण्याची संधी मिळाली नव्हती. आता त्याने भारतीय संघात पुनरागमन करण्याची जोरदार तयारी सुरू केली होती. यासाठी तो मुंबईत दाखल झाला आहे.
दिनेश कार्तिक मुंबईत अभिषेक नायर (Abhishek nayar) सोबत सराव करत आहे. दरम्यान त्याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “टी २० माझ्यासाठी एक नवी सुरुवात असेल. यात काही शंका नाही की, आयपीएल सारख्या स्पर्धांमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळत असते. ज्यामध्ये खेळाडूला आपले कौशल्य दाखवण्याची देखील संधी मिळत असते. मधल्या फळीतील फलंदाज म्हणून मी छाप सोडण्याच्या प्रयत्नात असणार आहे.”
त्याने आपला शेवटचा सामना २०१९ वनडे विश्वचषक स्पर्धेत खेळला होता. त्यानंतर त्याला संघाबाहेर करण्यात आले होते. संघातून बाहेर होण्यापूर्वी त्याने टी२० क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघ मध्यक्रमातील एका चांगल्या आणि अनुभवी फलंदाजाच्या शोधात आहे. त्यामुळे दिनेश कार्तिक देखील योग्य पर्याय ठरू शकतो.
शिखर धवन (३६ वर्ष) आणि शोएब मलिकचे (४० वर्ष) उदाहरण देत,दिनेश कार्तिक म्हणाला की, “संघात स्थान मिळवण्यासाठी आता वय पाहिले जात नाही. हे सर्व फॉर्म, फिटनेस आणि अनुभवावर निर्भर करते.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “निश्चितच भारतीय संघात पुनरागमन करत असताना, वय ही बाब लक्षात घेतली जात नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत शिखर धवन हा सर्वात यशस्वी फलंदाज होता. तो आणि मी एकाच वयाचे आहोत.” दिनेश कार्तिकने गतवर्षी कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आगामी हंगामासाठी त्याला कोलकता नाईट रायडर्स संघाने रिलीज केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
कायरन पोलार्ड स्लेज करत सूर्यकुमारला काय म्हणाला होता? स्वतः सूर्यकुमारने केला खुलासा
अंडर १९ संघातील खेळाडू भविष्यात हिट होण्यासाठी बीसीसीआयचा ‘मास्टरप्लॅन’, एकदा पाहाच