---Advertisement---

‘कोहलीची भूक पूर्वीसारखीच…’, CSKविरुद्धच्या सामन्यापूर्वी दिनेश कार्तिकची मोठी प्रतिक्रिया!

---Advertisement---

एक काळ असा होता जेव्हा फिरकी गोलंदाजी करून विराट कोहलीला शांत ठेवता येत असे. पण गेल्या वर्षीपासून त्याने फिरकीविरुद्धच्या खेळात खूप सुधारणा केली आहे. याची झलक आयपीएल 2025 च्या सलामीच्या सामन्यातही दिसून आली ज्यात कोहलीने शानदार अर्धशतक झळकावले.

या सामन्यात त्याने सुनील नरायण आणि वरुण चक्रवर्तीविरुद्ध दमदार फलंदाजी केली. आता आरसीबी चेन्नई सुपर किंग्जशी दोन हात करणार आहे. चेपॉक मैदान हे चेन्नई सुपर किंग्जचे गड राहिले आहे आणि यावेळी संघ आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि नूर अहमद या त्रिकुटांसह आरसीबीविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे. सीएसकेच्या फिरकी गोलंदाजांना तोंड देण्यासाठी कोहलीही घाम गाळत आहे, हे संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक दिनेश कार्तिकने स्वतः उघड केले आहे. कार्तिक म्हणाला की कोहलीची भूक पूर्वीसारखीच आहे.

सीएसके विरुद्ध आरसीबी सामन्यापूर्वी दिनेश कार्तिकने विराट कोहलीच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक केले. तो म्हणाला, “आजही मैदानावर आल्यावर विराट एका नवीन शॉटवर मेहनत घेत होता. या टप्प्यावर पोहोचूनही नवीन शॉट शिकण्याची त्याची जिद्द पाहून समजतं की त्याला अजूनही अपार भूक आहे. तो आपल्या खेळात सातत्याने सुधारणा करू इच्छितो आणि स्वतःचा दर्जा उंचावू पाहतो. म्हणूनच तो इतका खास आहे. सध्या, तो आयपीएलमध्ये पूर्वीसारख्याच आत्मविश्वासाने आणि जबरदस्त फॉर्ममध्ये फलंदाजी करत आहे.”

फिरकीपटूंविरुद्धच्या त्याच्या खेळीबाबत कार्तिक म्हणाला, “चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने अप्रतिम फलंदाजी केली होती. अलिकडच्या काळात तो फिरकीपटूंविरुद्धही प्रभावी ठरला आहे, विशेषतः पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये. मी आकडेवारीच्या खोलात जाणार नाही, पण मला आठवतं की वर्ल्ड कप फायनलमध्ये त्याने गरज असताना महत्त्वाच्या धावा केल्या होत्या. तसेच, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक होता. दुबईसारख्या फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवरही त्याने दमदार फलंदाजी केली होती. त्यामुळे मला वाटतं की सध्या तो पूर्वीसारखाच आत्मविश्वासाने आणि जबरदस्त लयीत खेळतो आहे.”

शुक्रवारी चेपॉक येथे पाच वेळा विजेत्या संघाविरुद्ध रजत पाटीदारच्या संघाला पुन्हा एकदा फिरकी गोलंदाजीची कसोटी लागणार आहे. आरसीबीच्या फलंदाजांसाठी फिरकी गोलंदाजी ही समस्या आहे का असे विचारले असता कार्तिक म्हणाला, “मला वाटत नाही की यात काही समस्या आहे. आम्ही नुकताच एक सामना खेळलो, गेल्या वर्षीच्या तुलनेत हा संघ पूर्णपणे नवीन आहे.”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---