बीसीसीआयने माजी कर्णधार राहुल द्रविडची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे. त्याचवेळी, आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ नंतर विराट कोहली देखील टी२० आंतरराष्ट्रीय कर्णधारपद सोडणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही, तर विराट वनडे संघाचे कर्णधारपदही गमावू शकतो, अशी चर्चा आहे.
विराट कोहलीनंतर उपकर्णधार रोहित शर्मा भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे, कारण त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये नेतृत्वक्षमता सिद्ध केली आहे. यातच दिनेश कार्तिकने कर्णधार निवडीबाबत एक सल्ला दिला आहे.
दरम्यान, दिनेश कार्तिकने एक उपाय शोधून काढला आहे, जो भारतीय संघाचे कर्णधारपदाचे कोडे सोडवू शकतो. एका वाहिनीशी बोलताना, या यष्टीरक्षक-फलंदाजाने सुचवले की संघ व्यवस्थापनाने रोहित शर्माचे नाव सध्यासाठी पुढे केले पाहिजे आणि भविष्यासाठी रिषभ पंत आणि केएल राहुल यांच्यासारख्या खेळाडूंना तयार केले पाहिजे.
दिनेश कार्तिक म्हणाला, ‘पांढऱ्या चेंडूच्या प्रकारामध्ये रोहित शर्माला एक-दोन वर्षे भारताचे नेतृत्व करण्याची संधी देणे योग्य ठरेल. त्याला दोन विश्वचषकांसाठी कर्णधार होऊ द्या. त्याचे श्रेय तुम्ही त्याला द्यावे आणि पुढे जाऊन त्याला कर्णधार म्हणून देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी. त्याला कर्णधार म्हणूनही आपले कौशल्य दाखवण्याची संधी दिली पाहिजे.’
तो पुढे म्हणाला, ‘ रोहितने एकदिवसीय आणि टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्याने खूप यश मिळवले आहे, त्याला त्याचे गुण माहित आहेत, त्याला त्याचे कौशल्य माहित आहे. रिषभ पंत किंवा केएल राहुलसारख्या तरुण खेळाडूंना घेऊन त्यांना कर्णधार बनवण्याआधी, तुम्हाला त्यांना संधी द्यावी लागेल.’
दिनेश कार्तिक पुढे म्हणाला की, पुढील भारतीय कर्णधार शोधण्यासाठी रोहित शर्मा आणि भारतीय क्रिकेट बोर्ड एकत्र काम करत आहेत. तरुण खेळाडू भारतीय संघाचे कर्णधार बनण्यास सक्षम आहेत, असे बीसीसीआयला वाटत असेल तर त्याचाही विचार करता येईल, असेही त्याने सुचवले.
महत्त्वाच्या बातम्या –
झम्पाच्या फिरकीची जादू! बांगलादेशविरुद्ध विकेट्सचे ‘पंचक’ पूर्ण करत तब्बल ४ मोठ्या विक्रमांना गवसणी