वेस्ट इंडीजचा माजी अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तरीदेखील तो अजूनही जगभरातील विविध टी२० लीगमध्ये खेळत असतो. ३८ वर्षीय ब्राव्होला आजही या टी२० लीगमध्ये मोठी मागणी आहे. युएईत होणाऱ्या इंटरनॅशनल लीग टी२० साठी मुंबई इंडियन्स फ्रॅंचायजीच्या मालकीच्या ‘एमआय एमिरेट्स’ संघाने त्याला करारबद्ध केले आहे. या कराराच्या अवघ्या काही तासानंतरच त्याने टी२० क्रिकेटमधील एक अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली.
ब्राव्हो सध्या इंग्लंडमध्ये होत असलेल्या द हंड्रेड लीगमध्ये सहभागी झाला आहे. तो या स्पर्धेत नॉदर्न सुपरचार्जर्स संघासाठी आपले कौशल्य दाखवतोय. ११ ऑगस्ट रोजी झालेल्या ओव्हल इनविन्सिबल विरुद्ध नॉदर्न सुपरचार्जर्स सामन्यात ब्राव्होने रायली रुसोला बाद करत टी२० क्रिकेटमधील आपला ६०० वा बळी मिळवला. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेटविश्वातील पहिला गोलंदाज बनला. आंतरराष्ट्रीय टी२० व टी२० लीगमधील त्याच्या कामगिरीचा यात समावेश आहे.
ब्राव्होनंतर दुसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा राशिद खान आहे. त्याच्या नावे ४६६ बळी जमा आहेत. त्यानंतर सुनील नरीन (४६० बळी), इम्रान ताहिर (४५१ बळी) व शाकीब अल हसन (४१८ बळी) यांचा क्रमांक लागतो.
ड्वेन ब्राव्होने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ९१ टी२० सामने खेळताना ७८ बळी मिळवले होते. याव्यतिरिक्त तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स व गुजरात लायन्स या संघासाठी खेळला आहे. तो बिग बॅश, सीपीएल, ग्लोबल टी२०,पीएसएल यांसारख्या विविध लीगमध्ये देखील सहभागी झाला आहे. आता यामध्ये एमआय एमिरेट्स संघाची भर पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsPAK: दुबईचे मैदान अन् रोहित शून्यावर बाद! चाहत्यांच्या कायम लक्षात राहिलेला ‘तो’ सामना
Asia Cup 2022 | पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी विराटने सुरू केला सराव, पाहा व्हिडिओ
Asia Cup 2022 | बुमराहच्या अनुपस्थितीत चमकदार कामगिरी करू शकतात भारताचे ‘हे’ तीन गोलंदाज