मेलबर्न। आज(28 जानेवारी) ऑस्ट्रेलियन ओपन 2020मध्ये सार्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच विरुद्ध कॅनडाच्या मिलोस राओनिकमध्ये उपांत्य फेरीचा सामना झाला. 2 तास 49 मिनिटे चाललेल्या या सामन्यात जोकोविचने 6-4, 6-3, 7-6(1) अशा फरकाने विजय मिळवला आणि 8 व्यांचा ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
आता गुरुवारी (30 जानेवारी) जोकोविचचा सामना स्विझर्लँडचा टेनिस स्टार रॉजर फेडरर विरुद्ध होणार आहे. फेडररने आज अमेरिकेच्या टेनिस सँडग्रेनला उपांत्यपूर्व फेरीच्या रोमांचकारी झालेल्या सामन्यात 6-3, 2-6, 2-6, 7-6(8), 6-3 असे पराभूत केले आहे आणि 15 व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
त्यामुळे आता 50 व्यांदा फेडरर आणि जोकोविच हे दिग्गज टेनिसपटू आमने-सामने येणार आहेत. आत्तापर्यंत या दोघांमध्ये झालेल्या एकूण 49 सामन्यांत 26 वेळा जोकोविचने विजय मिळवला आहे. तर 23 वेळा फेडरर विजयी झाला आहे.
तसेच मेलबर्नमध्ये हे दोघे 4 वेळा आमने-सामने आले असून यात 3 वेळा जोकोविच तर 1 वेळा फेडरर विजयी झाला आहे. विशेष म्हणजे जोकोविचचे फेडरर विरुद्धचे हे तीनही विजय ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीतील आहेत.
जोकोविचने आत्तापर्यंत 7 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे. विशेष म्हणजे त्याने याआधी 7 वेळा उपांत्य फेरीत प्रवेश केला असून सर्व 7 उपांत्य फेरीचे सामने जिंकले आहेत आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. तसेच 7 ही अंतिम सामने जिंकून विजेतेपद मिळवले आहे.
गुरुवारी फेडररचा सामना करण्यापूर्वी जोकोविच म्हणाला, ‘मी रॉजरचा आणि त्याने या खेळात मिळवलेल्या यशाचा खूप आदर करतो. रॉजर आणि राफा विरुद्धच्या सामन्यांमुळे मी जसा आत्ता आहे तसा खेळाडू बनलो. मला अशा खेळाडूंबरोबर खूप सामने खेळायला मिळाल्याचा आनंद आहे. आज रॉजरने जसा सामना जिंकला ते शानदार होते आणि असे त्याने कारकिर्दीत अनेकदा केले आहे. जो चांगला खेळेल तो गुरुवारी जिंकेल.’
https://twitter.com/AustralianOpen/status/1222127828935770112






