आज(27 जानेवारी) ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत नोव्हाक जोकोविचने स्पेनच्या राफेल नादालला पराभूत करत पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवले आहे. हे जोकोविचचे सातवे ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या जोकोविचने दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या नदालला 6-3, 6-2, 6-3 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. त्याचबरोबर कारकिर्दीतील 15 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवत पीट सँप्रस यांचा 14 ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा विक्रमही मागे टाकला आहे.
तो आता सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या पुरुष टेनिसपटूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत 20 ग्रँडस्लॅमसह रॉजर फेडरर पहिल्या तर 17 ग्रँडस्लॅमसह नदाल दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तसेच त्याने सातव्यांदा ऑस्ट्रेलिय ओपन ग्रँडस्लॅम जिंकत रॉय इमरसन आणि रॉजर फेडरर यांचा 6 ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा विक्रमही मोडला आहे.
जोकोविचने दुखापतीनंतर पुनरागमन करताना सलग तिसरे ग्रँडस्लॅम जिंकले आहे. त्याने याआधी 2018 चे विम्बल्डन आणि यूएस ओपन ग्रँडस्लॅमचेही विजेतेपद मिळवले आहे.
Magnificent Seven!@DjokerNole is the #AusOpen 2019 men’s singles champion def. Rafael Nadal 6-3 6-2 6-3.#AOChampion #AusOpenFinal pic.twitter.com/x5oRr6pfuO
— #AusOpen (@AustralianOpen) January 27, 2019
असा झाला सामना –
2 तास 4 मिनीटे चाललेल्या या सामन्यात पहिल्या सेटपासूनच जोकोविचने नदालवर पूर्णपणे वर्चस्व ठेवले होते. त्याने या सेटमध्ये पहिले दोन्ही गेम्स जिंकत 2-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या तीन गेम्समध्ये जोकोविचने13 पैकी 12 पॉइंट्स जिंकले.
त्यामुळे जोकोविचने तिसरा गेमही जिंकत आघाडी वाढवली. पण त्यानंतर नदालने पुनरागमन करत चौथा गेम जिंकला. पण जोकोविचने त्याचा समतोल राखला होता. त्यामुळे 36 मिनीटे झालेला हा सेट जोकोविचने 6-3 असा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्येही जोकोविचचा खेळ उंचावलेला होता. नदालच्या चांगल्या बॅकहँड फटक्यानंतरही जोकोविचने 3-2 अशी आघाडी राखली होती. यानंतर मात्र त्याने या सेटमध्ये एकही गेम नदालला जिंकू दिला नाही. जोकोविचने या सेटमध्ये फक्त एक अनफोर्स एरर केला, तर 40 मिनीटाच्या या सेटमध्ये 45 पैकी 30 पॉइंट्स जिंकले.
तिसऱ्या सेटमध्येही नदालने त्याचा संघर्ष कायम ठेवला होता. मात्र त्याला या सेटमध्येही जोकोविचवर वर्चस्व ठेवता आले नाही. या सेटमध्येही 3-2 अशी जोकोविचने आघाडी घेतली होती. यानंतरही नदालला जोकोविचला रोखता आले नाही. अखेर जोकोविचने हा सेट 6-3 असा सहज जिंकत ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपदही पटकावले.
🏆 2008
🏆 2011
🏆 2012
🏆 2013
🏆 2015
🏆 2016
🏆 2019@DjokerNole #AOChampion | #AusOpen |#AusOpenFinal pic.twitter.com/ZEG2ok7TeW— #AusOpen (@AustralianOpen) January 27, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
–सायना नेहवालला इंडोनेशिया मास्टर्सचे विजेतेपद
–विराट कोहलीने म्हणतो, विश्वचषक जिंकण्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट करावी लागेल
–शून्यावर बाद झाल्यानंतर ६८ वर्षीय क्रिकेटपटूने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती