लंडन। विंबल्डन 2018 च्या उंपात्यफेरीतील रंगत शनिवार, 14 जुलैलाही पहायला मिळाली. शनिवारी सार्बियाच्या नोव्हाक जोकोविचने उंपात्यफेरीच्या सामन्यात अव्वल स्थानावर असणाऱ्या राफेल नदालचा पराभव करत पाचव्यांदा विंबल्डनची अंतिम फेरी गाठली आहे.
त्याने नदालला 5 तास 14 मिनिटे चाललेल्या सामन्यात 6-4, 3-6, 7-6 (11-9), 3-6, 10-8 असे 5 सेटमध्ये पराभूत केले आहे. 2016 च्या यूएस ओपननंतर जोकोविचने पहिल्यांदाच ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.
या विजयाबद्दल जोकोविच म्हणाला, ” मी खरचं खूप आनंदी आहे. मी सामन्यानंतर भावूक झालो होतो. कारण 15 महिने मी अनेक अडचणींमधून बाहेर यायचा प्रयत्न करत होतो. आत्ता मी जिथे आहे त्याचे मला समाधान आहे.”
याआधी जोकोविच आणि नदालमध्ये ग्रँडस्लॅम स्पर्धेत आत्तापर्यंत 14 सामने झाले आहेत. त्यातील 9 सामन्यात नदालने बाजी मारली होती तर 4 वेळा जोकोविचला विजय मिळवण्यात यश आले आहे. ़
त्याचबरोबर शनिवारी हे दोघे एकूण 52 व्या वेळा आमने सामने आले होते. यात विजयाच्या सरासरीत जोकोविच आघाडीवर आहे. त्याने 27 वेळा नदालवर विजय मिळवला असुन नदालला 25 वेळा जोकोविच विरुद्ध विजय मिळवण्यात यश आले आहे.
जोकोविचने आत्तापर्यंत 12 ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळवली आहेत. यात त्याने 2011,2014 आणि 2015 मध्ये विंबल्डनचे विजेतेपद मिळवले आहे. त्यामुळे 15 जुलैला तो त्याच्या काराकिर्दीतील एकूण 13 वे तर विंबल्डनचे चौथे विजेतेपद मिळवण्यास उत्सुक असेल.
मात्र त्याला यासाठी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा सामना करावा लागणार आहे. अँडरसनने उपांत्यपूर्व फेरीत रॉजर फेडररला पराभवाचा धक्का दिला होता. तसेच उपांत्य फेरीत जॉन इस्नरचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.
जोकोविच विरुद्ध नदाल यांच्यात शनिवारी पार पडलेल्या सामन्याची सुरुवात शुक्रवारी झाली होती. परंतू अँडरसन विरुद्ध इस्नर यांच्यातील सामना 6 तास 36 मिनिटे चालला.
त्यामुळे जोकोविच विरुद्ध नदाल यांचा सामना 3 सेटनंतर थांबवण्यात आला होता. त्यावेळी जोकोविचने अघाडी घेतली होती. त्यानंतर शनिवारी जोकोविच विरुद्ध नदाल यांच्यातील उर्वरित सामना पार पडला.
आता रविवारी 15 जुलैला अँडरसन विरुद्ध जोकोविच यांच्यात अंतिम फेरी रंगेल. हे दोघे 6 सामन्यात आत्तापर्यंत सामोरा-समोर आले असुन 5 वेळा जोकोविच जिंकला आहे.
For the first time since 2016, @DjokerNole is a Grand Slam finalist.
The Serbian beats Rafael Nadal 6-4, 3-6, 7-6(9), 3-6, 10-8 in a Centre Court classic to reach the #Wimbledon final pic.twitter.com/YJyi5tlHpv
— Wimbledon (@Wimbledon) July 14, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–Video: भारत-इंग्लंड चालू सामन्यातच त्याने प्रेयसीला घातली लग्नाची मागणी
–भारताला वनडे मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी