सारख्याच वयाच्या खेळाडूंना एकसोबत खेळताना पाहणे हे साहजिक आहे. परंतु एखादा खेळाडू आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या खेळाडूबरोबर खेळत असेल, तर त्यात आश्चर्य वाटू शकते. कारण हे घडले आहे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबरोबर.
ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीत आहे की सध्याचे भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता सुनील जोशी (Sunil Joshi) आणि विराट कोहली (Virat Kohli) एकाच संघाकडून खेळले आहेत. आयपीएल (IPL) २००८ मध्ये दोघेही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे भाग होते. विराटने त्यावेळी भारतीय संघाकडून एकही सामना खेळला नव्हता.
त्याचवर्षी विराटच्या नेतृत्वात भारताने १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी दिल्ली डेअरडेविल्स (आताचा दिल्ली कॅपिटल्स) संघाकडे विराटला आपल्या संघात घेण्याची संधी होती. परंतु दिल्लीने प्रदीप सांगवानला आपल्या संघात सामील केले होते. त्यानंतर शेवटी आरसीबीने विराटला आपल्या संघात सामील केले होते.
पहिल्या सामन्यात खेळले होते एकसोबत
आयपीएल इतिहासातील पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघात खेळण्यात आला होता. तो सामना केकेआरचा फलंदाज ब्रेंडन मॅक्यूलमच्या (Brendon McCullum) नाबाद १५८ धावांच्या खेळीसाठी ओळखला जातो. विराटबरोबर त्या सामन्यात जोशीही खेळले होते.
त्या सामन्यात जोशी यांनी ३ षटके गोलंदाजी करताना एकही विकेट न घेता २६ धावा दिल्या होत्या. याव्यतिरिक्त फलंदाजी करताना जोशी यांनी ६ चेंडूत केवळ ३ धावांची खेळी केली होती. त्या सामन्यात विराटने ५ चेंडूत केवळ १ धाव केली होती.
जोशी यांनी खेळले केवळ ४ सामने
जोशी यांनी आयपीएल कारकिर्दीत ४ सामने खेळले. पहिल्याच मोसमात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्यांनी आपला शेवटचा सामना खेळला होता. ४ सामन्यात त्यांना केवळ एक विकेट मिळाली, तर फलंदाजी करताना त्यांंनी केवळ ६ धावा केल्या.
विराटने त्याच मोसमात १३ सामने खेळले. त्यात त्याने १५ च्या सरासरीने १६५ धावा केल्या होत्या. तेव्हापासून आतापर्यंत विराट आरसीबीशी जोडला आहे. आज विराट ५४१२ धावांबरोबर आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने केलेल्या सर्व धावा या आरसीबी संघाकडूनच केल्या आहेत.
भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू सुनील जोशी वरिष्ठ भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य निवडकर्ता बनले आहेत. त्यांनी एमएसके प्रसाद यांचे स्थान घेतले आहे. प्रसाद यांनी २०१६ टी२० विश्वचषकानंतर मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी सांभाळली होती. जोशी यांनी भारताकडून १५ कसोटी आणि ६९ वनडे सामने खेळले आहेत. त्यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २००१मध्ये पुणे येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो, ‘भारताचे हे ३ खेळाडू आहेत गाढव’
-भूत पाहून सौरव गांगुलीचीही टरकली! फायरब्रिगेडला बोलवलं थेट घरी
-फाफ डुप्लेसिसचा खुलासा; जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर यांच्यामध्ये आहे ही समानता