आशियाई क्रिकेट परिषद म्हणजेच एसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी मागील वर्षी आशिया चषक 2023चे यजमानपद पाकिस्तानला सोपवले होते. यानंतर त्यांनी आता यु-टर्न घेत घोषणा केली की, आशिया चषक 2023चे आयोजन एखाद्या तटस्थ ठिकाणावर होईल. यामागील कारण म्हणजे, भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नाही. शाह यांच्या या वक्तव्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. त्यांंनी एसीसीची तातडीने बैठक घेण्याची मागणी केली आहे. तसेच, पुढील वर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषकातून बाहेर पडण्याची धमकीदेखील दिली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (Pakistan Cricket Board) अशी इच्छा आहे की, आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेचे आयोजन त्यांच्याच देशात व्हावे. तसेच, भारताने पाकिस्तानात खेळायला यावे. दुसरीकडे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Board of Control for Cricket in India) म्हणजेच बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, भारत सरकारच्याय परवानगीशिवाय ते पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाचा दौरा करू शकत नाहीत. भारतीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Sports Minister Anurag Thakur) यांनीही म्हटले आहे की, हा निर्णय गृह मंत्रालय घेईल की, भारत पाकिस्तानचा प्रवास करणार की नाही. मात्र, भारत सरकार याची परवानगी देण्याची शक्यता कमी आहे.
आयसीसी करणार हस्तक्षेप?
या शाब्दिक वादामध्ये आता माजी क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल (International Cricket Council) म्हणजेच आयसीसीकडे बीसीसीआय आणि पीसीबी प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी करत आहेत. मात्र, आयसीसीकडे तेवढी क्षमता आहे का, ज्याने हा मुद्दा सोडवला जाऊ शकतो? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे. आयसीसीकडे अशी कोणतीही शक्ती नाहीये, जी देशांमधील क्रिकेट बोर्डांमध्ये सुरू असलेला वाद संपवू शकेल. यामागील कारण म्हणजे, त्यांचे काम क्रिकेट नियंत्रित करणे आणि त्याचे प्रशासन करणे आहे. दोन देशातील वाद संपवणे नाही.
भारत विरुद्ध पाकिस्तान संघात द्विपक्षीय सामने होणार की नाही, हे दोन्ही देशांच्या सरकार आणि बोर्डामधील परस्पर संबंधांवर अवलंबून आहे. आयसीसीच्या हातात या गोष्टी असत्या, तर भविष्यातील वेळापत्रकामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान द्विपक्षीय मालिकांचा उल्लेख असता. आयसीसीही त्यांच्या भविष्यातील वेळापत्रक तयार करते, जे दोन्ही देश यासाठी तयार असतात, ते त्यांच्या निर्धारित वेळेवर कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळतील. दुसरीकडे, आशिया चषकात आयसीसी यासाठी हस्तक्षेप करणार नाही, कारण त्याच्या आयोजनाची जबाबदारी आशियाई क्रिकेट काऊंसिलची असते.
त्यामुळे आता आशिया चषक 2023मध्ये काय होते, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 दिग्गजांच्या पंक्तीत बसला आयर्लंडचा हिरो पॉल स्टर्लिंग; देशाचीही उंचावली मान
पाकिस्तान संघाच्या जर्सीत दिसला रोहित शर्मा! पाहा नक्की काय आहे प्रकरण