---Advertisement---

एवढं चांगल खेळत असूनही कोहलीसमोर आहे हे मोठं संकट

On: शनिवार, मार्च 9, 2019 8:13 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत चांगल्या लयीत खेळत आहे. त्याने या मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यात सलग शतकी खेळी देखील केल्या आहेत. मात्र त्याच्यासमोर ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज ऍडम झम्पाचे आव्हान आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत आणि सध्या सुरु असलेल्या वनडे मालिकेत मिळून आत्तापर्यंत विराट चार वेळा बाद झाला आहे. यातील तीन वेळा तर त्याला झम्पानेच बाद केले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या या भारत दौऱ्यात विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात झम्पाने विराटला बाद केले होते. तर त्यानंतर हैद्राबादमध्ये झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात तसेच शुक्रवारी(8 मार्च) रांची येथे झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यातही विराटला झम्पानेच बाद केले.

त्याचबरोबर झम्पाने मागील एक वर्षात टाकलेल्या 193 चेंडूमध्ये विराटला पाचवेळा बाद केले आहे.

पण असे असले तरी झम्पाने विराट हा त्याचा बनी(एखादा फलंदाज एकाच गोलंदाजाच्या चेंडूवर सातत्याने बाद होणे) नसल्याचे म्हटले आहे.

तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवल्यानंतर विराटबद्दल बोलताना झम्पा म्हणाला,  ‘आम्ही चांगली गोलंदाजी केली. विशेष करुन वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीला कमालीची गोलंदाजी केली. विराट एक गंभीर खेळाडू आहे. त्याची विकेट घेण्याने खूप चांगले वाटते. मला नाही वाटत तो माझा बनी आहे. त्याला गोलंदाजी करणे अवघड आहे.’

विराटने तिसऱ्या वनडेत 38 व्या षटकात झम्पाच्या गोलंदाजीवर सलग चौकार मारले होते. त्याबद्दल झम्पा म्हणाला, ‘मी थोडा दबावात होतो. त्याने जर अजून काही बाउंड्रीज मारले असते तर सामना त्यांच्याकडे झुकला असता.’

38 व्या षटकात विराटने पहिल्या दोन चेंडूवर चौकार मारल्यानंतर झम्पाने तिसऱ्या चेंडूवर विराटला त्रिफळाचीत केले होते. तसेच त्याआधी झम्पाने या सामन्यात एमएस धोनी आणि केदार जाधव यांची विकेट घेतली होती.

झम्पा या मालिकेत चांगली कामगिरी करत असून त्याने आत्तापर्यंत तीन वनडे सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहेत.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पुढील सामना रविवारी (10 मार्च) मोहाली येथे होणार आहे. तर शेवटचा आणि पाचवा वनडे सामना दिल्ली येथे 13 मार्चला होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

चौथ्या वनडे सामन्यासाठी टीम इंडियात होऊ शकतात ३ बदल

सगळ्या पाकिस्तानच्या खेळाडूंएवढ्या सेंच्युरी केल्यात एकट्या किंग कोहलीने

एमएस धोनी पाठोपाठ हा खेळाडूही मोहाली वनडेतून बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment