---Advertisement---

भारतीयांचे वर्चस्व असणाऱ्या या यादीत आता रोहित शर्मालाही मिळाले स्थान!

---Advertisement---

रांची। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात कालपासून(19 ऑक्टोबर) तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु झाला आहे. जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे सुरु असलेल्या या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने आज द्विशतकी खेळी केली आहे.

त्याने 255 चेंडूत 212 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 28 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत. हे रोहितचे कसोटी कारकिर्दीतील पहिलेच द्विशतक होते.

या द्विशतकाबरोबरच त्याने खास पराक्रमही केला आहे. तो आता वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा जगातील चौथाच क्रिकेटपटू ठरला आहे. रोहितने याआधी वनडेमध्ये 3 द्विशतके करण्याचा कारनामा केला आहे.

तसेच यापूर्वी वनडे आणि कसोटी या दोन्ही क्रिकेटप्रकारात द्विशतके करण्याचा पराक्रम सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल यांनी केला आहे. या तिघांनीही वनडेमध्ये प्रत्येकी 1 द्विशतक केले आहे.

तसेच कसोटीमध्ये सचिन आणि सेहवागने प्रत्येकी 6 वेळा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. तर ख्रिस गेलने 3 वेळा 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.

रोहितला आज रांची कसोटीत कागिसो रबाडाने बाद केले. तो बाद होण्याआधी त्याने अजिंक्य रहाणेबरोबर चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारी केली होती. रहाणने 115 धावांची शतकी खेळी केली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---