भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक असलेल्या ड्रीम इलेव्हनने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली प्रतिस्पर्धी कंपनी माय इलेव्हन सर्कलची जाहिरात करत असल्याबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिली. ड्रीम इलेव्हन कंपनीचे सह-संस्थापक हर्ष जैन यांनी गांगुलीने प्रतिस्पर्धी कंपनीची जाहिरात करत असल्याबाबत आपल्याला कुठलीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले. ड्रीम इलेव्हन भारतीय क्रिकेट संघाचे प्रायोजक आहेत.
ड्रीम इलेव्हनचे सह-संस्थापक तसेच मुख्य कार्यकारी असलेल्या हर्ष जैन यांनी पीटीआयशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “बीसीसीआयचे अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुली यांनी माय इलेव्हन सर्कल कंपनीची जाहिरात करण्याबाबत आम्हाला कोणताही आक्षेप नाही. हा बीसीसीआयचा अंतर्गत मामला आहे आणि आम्ही त्यात हस्तक्षेप करू इच्छित नाही. त्यामुळे मला यावर काहीही टिप्पणी करायची नाही.”
ड्रीम इलेव्हन आणि माय इलेव्हन सर्कल हे दोन्हीही ऑनलाईन फँटसी प्लॅटफॉर्म आहेत. एकीकडे ड्रीम इलेव्हन भारतीय संघाचे प्रायोजक असताना बीसीसीआयच्या अध्यक्षांनी प्रतिस्पर्धी कंपनीची जाहिरात करणे, हा परस्पर हितसंबंधांचा मुद्दा होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जात होती. याबाबत बोलताना वकील विदुषपत सिंघानिया म्हणाले, “हे प्रकरण परस्पर हितसंबंधांच्या गटात मोडत नाही. जर बीसीसीआयशी करार करताना एखाद्या प्रायोजक कंपनीने कुठल्याही पदाधिकाऱ्याने प्रतिस्पर्धी कंपनीची जाहिरात करू नये अथवा त्यांच्याशी व्यावहारिक पातळीवर संबंध ठेवू नये, अशी अट टाकली असेल तरच परस्पर हितसंबंधाचा मुद्दा आड येऊ शकतो. ड्रीम इलेव्हनच्या बाबतीत त्यांची अशी कुठलीही अट असेल, असं मला वाटत नाही.”
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने देखील हे प्रकरण गंभीर नसल्याचे स्पष्ट केले. याआधी गांगुलीने बायजूस आणि टाटा मोटर्सच्या जाहिरातीचा प्रस्तावही परस्पर हितसंबंधांच्या कारणानेच नाकारला होता असे सांगत या वरिष्ठ अधिकाऱ्याने ड्रीम इलेव्हनच्या बाबतीतही चिंतेचे कारण नसल्याचे स्पष्ट केले. याआधीही असे प्रकरण तापविण्याचे प्रयत्न झाले होते, परंतु ते फोल ठरले होते. यावेळी देखील असेच होईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
– विराट तर गेला, आता पाहू भारतीय संघ कशाप्रकारे उर्जा मिळवणार
– व्हिडिओ: भारतीय संघ सरावात घेतोय कठोर मेहनत, दुसर्या कसोटीतील प्लेइंग इलेव्हनचेही मिळाले संकेत
– बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी सचिनचा भारतीय फलंदाजांना कानमंत्र, म्हणाला