आयसीसी टी20 विश्वचषक 2026 नंतर भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा फलंदाजीत खास कामगिरी करण्यात सातत्याने अयपशी ठरत आहे. तेव्हापासून त्याने 10 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळताना केवळ एकच अर्धशतकी खेळी केली, जी त्याने इंग्लंडविरुद्ध केली होती. त्यानंतर तो झिम्बाब्वे दौऱ्यात पूर्णपणे अपयशी ठरला. तीन सामन्यांमध्ये तो केवळ 11 च धावा करू शकला. त्याची ही निराशाजनक कामगिरी पाहून भारताचे माजी कर्णधार आणि माजी मुख्य निवडकर्त्यांनी कठोर निर्णयाची मागणी केली आहे.
दिग्गज के श्रीकांत यांनी जर अभिषेकच्या कामगिरीमध्ये अशीच घसरण होत असेल, तर निवड समितीने त्याला संघातून काढून टाकावे, असे मत व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनच्या संघात परतण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.
श्रीकांत यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर म्हटले, “2026 टी20 विश्वचषकापासूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विरोधी संघांनी अभिषेकला बाद करण्याचा उपाय शोधून काढला आहे. मला वाटते आता त्याच्याविरुद्ध कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. माझ्या मते, संजूला आणखी एक संधी दिली पाहिजे. त्याला नक्कीच संघात बोलावले जाईल. निवड समितीला कठीण निर्णय घ्यावाच लागेल.”
संजूने टी20 विश्वचषक 2026 मध्ये भारताच्या विजेतेपदामध्ये मुख्य कामगिरी बजावली होती. त्यानंतर त्याने चार टी20 सामन्यांमध्ये भारतासाठी खेळताना केवळ 33 धावा केल्या. त्याचा परिणाम म्हणून त्याला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघातून वगळण्यात आले. त्याच्या अनुपस्थितीत अभिषेकसोबत वैभव सूर्यवंशी सलामीला आला आणि त्याने प्रभावी कामगिरी केली.
दोन वर्षानंतर भारतीय संघात परतल्यावर झिम्बाब्वे दौऱ्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या मयंक यादवचे श्रीकांत यांनी कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले, “मयंकला तिन्ही सामने खेळताना पाहून आनंद झाला. तो खूप सातत्यपूर्ण होता, यावरून भारताचे भविष्य उज्वल आहे. तुम्ही योग्य युवा खेळाडूंना पाठिंबा दिला पाहिजे. मला अशोक शर्माबद्दल काही अडचण नाही.”
भारतीय टी20 संघ आता सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये खेळणार आहे. यासाठी निवडलेल्या संघात अभिषेक आणि वैभवबरोबर सॅमसनचाही समावेश आहे. (Drop Abhishek Sharma from the team! Former Indian captain says, “Opposing teams have figured out how to get him out…”)






