भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. या मालिकेतील दोन सामने शिल्लक असून पुढचा सामना सिडनीच्या मैदानावर खेळविण्यात येणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघापुढे एक यक्षप्रश्न उभा ठाकला आहे.
दुखापतीतून सावरलेल्या रोहित शर्माने विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला असून तो आता संघात दाखल झाला आहे. अशावेळी पुढच्या कसोटीत त्याला संधी मिळणार का, आणि त्याला संधी द्यायची झाल्यास कोणाला वगळायचे, या चर्चेला आता उधाण आले आहे. नुकतेच भारताचे माजी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनीही यासंदर्भात आपले मत मांडले.
मयंक किंवा विहारीला संघाबाहेर जावे लागणार
एमएसके प्रसाद म्हणाले, “रोहित शर्माला संघात स्थान द्यायचे असल्यास मयंक अगरवाल किंवा हनुमा विहारी यांच्यापैकी कोणाला तरी वगळावे लागेल. मात्र हा एक कठीण निर्णय असेल. विशेषतः मयंकला संघाबाहेर बसवणे कठीण असेल, कारण गेल्या १८ महिन्यात त्याने एक शतक आणि एक द्विशतक देखील झळकाविले आहे. आणि रोहितबाबत बोलायचे झाल्यास मी त्याच्या फलंदाजीबाबत खात्रीलायक विधान करू शकत नाही, कारण तो मोठ्या विश्रांतीनंतर पुनरागमन करत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत भारतीय संघासाठी हा निर्णय नक्कीच कठीण आहे.”
मात्र रोहित शर्मा उपलब्ध असल्यास त्याला निश्चित खेळवावे, असे मतही प्रसाद यांनी मांडले. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीदेखील रोहित शर्माशी संवाद साधल्यानंतर त्याच्या समावेशाबाबत अंतिम निर्णय घेतल्या जाईल असे स्पष्ट केले होते. तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीपासून सुरु होईल.
महत्वाच्या बातम्या:
– ब्रेकिंग: भीषण अपघातातून बालंबाल बचावले मोहम्मद अझरुद्दीन, गाडीचा झाला चक्काचूर
– डेविड वॉर्नरचे पुनरागमन! असा आहे भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ
– अटीतटीच्या बॉक्सिंग डे कसोटीत न्यूझीलंडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय