अनेक क्रिकेटर्समध्ये जन्मताच टॅलेंट ठासून भरलेले असते. अनेक जण त्याचा योग्य वापर करत सातत्य टिकवत महानतेच्या शिखरापर्यंत पोहोचतात. क्रिकेटविश्वात एक खेळाडू आणि एक व्यक्ती म्हणून आपले मानाचे स्थान तयार करतात. जंटलमन्स गेम या क्रिकेटच्या नावाला आणखी बुलंद करतात. त्याचवेळी असे काही क्रिकेटर असतात, ज्यांच्यामध्ये त्याच क्षमतेने टॅलेंट असते, मात्र त्याबरोबरच काही वाईट सवयी त्यांचे करिअर नेहमीच संकटात आणत असतात. असाच एक क्रिकेटर एँड्र्यू सायमंड्स याचे नुकतेच निधन झाले. मैदानावर तो मॅचविनर होता यात काही शंकाच नाही. मात्र, मैदानाबाहेर त्याला कायम दारूडा म्हणून हिणवले गेले. दारूच्या नशेत त्याने टीम मीटिंगला दांडी मारली, कर्णधाराशी भांडण केलं. नेहमी वादात राहिला.
असे करणारा सायमंड्स एकटा नव्हे. क्रिकेट जगतात असे काही क्रिकेटर्स आहेत जे अत्युच्च दर्जाची क्षमता असतानाही फक्त, दारूच्या नशेमुळे महानतेकडे जाण्यास आणि आदर्श होण्यापासून वंचित राहिले. अशाच क्रिकेटर्सविषयी आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया…
सायमंड्सनंतर दारुमुळे सर्वात बदनाम झालेला आणि खरंच दारूमुळेच अकाली करिअर संपलेला क्रिकेटर म्हणजे न्यूझीलंडचा जेसी रायडर. अटॅकिंग बॅटर आणि मिडीयम पेस बॉलिंग करणारा रायडर अल्पावधीतच तुफान प्रसिद्ध झाला होता. एका चांगल्या क्रिकेटर सोबतच त्याची पार्टी बॉय अशी इमेज होती. त्याला अगदी लहानपणी दारूचे व्यसन लागलेले. पुढे इंटरनॅशनल क्रिकेटर बनला तरीही त्याचे हे व्यसन कमी झाले नाही. त्याच्या मारहाणीच्या घटना सातत्याने समोर यायचा. असाच एक दिवस तो दारूच्या नशेत असताना, २०१३ मध्ये त्याला एका टोळक्याने क्राइस्टचर्च येथे जबर मारहाण केली. त्यानंतर रायडर कोमात गेला. तीन वर्षांनी त्याने कमबॅक केला, पण दारू आणि बेशिस्त वर्तन यामुळे त्याच करिअर पुढे जाऊ शकल नाही.
यादीतील दुसरे नाव आहे इंग्लंडचा माजी स्पिनर मॉन्टी पानेसर याचे. २०१२ मध्ये टीम इंडियाला घरच्या मैदानांवर पराभूत करण्यात मॉन्टीची निर्णायक भूमिका राहिली होती. या ऐतिहासिक सिरीजचा हिरो असलेला मॉन्टी अनेकदा नशेत असायचा. त्याला तब्बल पाच वेळा दारू पिल्यामुळे शिक्षा अथवा दंड झालाय. त्याचं करिअर संपवण्यासाठी देखील दारूच कारणीभूत ठरली. लंडन येथे एका बारच्या बाहेर दोन बाऊन्सरवर लघवी केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवला गेला. ही गोष्ट इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अत्यंत गांभीर्याने घेतली आणि त्याच्यावर कारवाई केली. करियर ऐनभरात असताना २०१३ पासून तो पुन्हा इंटरनॅशनल क्रिकेट खेळताना दिसलाच नाही.
मॉडर्न क्रिकेटमधील ऑल टाईम ग्रेटेस्ट ऑलराऊंडर एँड्र्यू फ्लिंटॉफ याचं करिअर दुखापत आणि बेशिस्त वागण्यामुळे ३१ व्या वर्षीच संपलं. ९ वर्षाच्या करियरमध्ये तो लक्षात राहणारा क्रिकेटर नक्कीच बनला, मात्र त्याचा आदर्श कोणीही घेऊ इच्छित नाही. फ्लिंटॉफने स्वतः कबूल केले होते की, मी १७ व्या वर्षापासून ड्रिंक करत आलोय. तो अनेकदा पब्लिक प्लेसमध्ये दारू पिताना दिसायचा. इतकच काय तर त्याने ऍशेस २००५ नंतर चक्क ब्रिटनच्या पंतप्रधानाच्या खुर्चीत बसून बिअर प्यायली होती. त्याच्या अशाच बेशिस्त वागण्यामुळे आणि फिटनेस नसल्या कारणाने दुखापतग्रस्त होऊन त्याची कारकीर्द संपुष्टात आली.
आकडेवारीच्या बाबतीत सध्या एक दिग्गज क्रिकेटर बनत चाललेला ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर हा देखील आपल्या याच वाईट सवयीसाठी ओळखला जात होता. आपल्या करिअरच्या सुरुवातीला दारू पिऊन वॉर्नरने राडे घातलेले. २०१३ ला बर्मिंघम येथे एका बारमध्ये त्याने चक्क इंग्लंडचा क्रिकेटर जो रूट यालाच मारहाण केली होती. या वादाचे कारण समजले नव्हते. मात्र यानंतर त्याने जवळपास तीन वर्षे दारूला स्पर्शही केला नाही. २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादने आयपीएल जिंकल्यानंतर त्याने दारू प्यायली होती. २०१७ मध्ये वॉर्नरचा तापट स्वभाव पुन्हा दिसला होता व त्याने दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकची कॉलर पकडलेली.
जेम्स फॉकनर हा क्रिकेट जगतातील पुढचा मोठा अष्टपैलू होणार अशी चर्चा सुरू झालेली. त्याने बॅट आणि बॉलने दाखवलेले पराक्रम अचंबित करणारे होते. ऑस्ट्रेलियासाठी आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयलसाठी शानदार कामगिरी केलेली. २०१५ वर्ल्डकप फायनलचा तो मॅन ऑफ द मॅच होता. असे असताना त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा वाद २०१५ मध्येच आला जिथे तो मँचेस्टरमध्ये दारू पिऊन गाडी चालवताना आढळला. लँकेशायरकडून काउंटी खेळायला गेलेल्या फॉकनरला मॅंचेस्टर पोलिसांनी त्यानंतर अटक केली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या देशाची प्रतिमा खराब केल्याबद्दल कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, नंतर त्याचा परफॉर्मन्स ढासळल्याने तो पुन्हा कधीच ऑस्ट्रेलियासाठी खेळला नाही.
महा स्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एलिमिनेटर सामन्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आरसीबीच्या दिनेश कार्तिकला दंड, कारण गुलदस्त्यात
‘चूका कर आणि लोकांसमोर अपयशी हो’, अश्विनला भारताच्या माजी प्रशिक्षकाने दिलेला अनोखा गुरूमंत्र
संजू सॅमसनला बेंगलोरच्या ‘या’ दोन गोलंदाजांपासून राहावं लागेल सावध, बनू शकतात राजस्थानचा काळ