आजपासून सुरु झालेल्या दुबई सुपर सिरीज फायनल स्पर्धेत अ गटातून खेळताना भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने सलामीच्या सामन्यात चीनच्या ही बिंगजियाओला पराभूत करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सिंधूने पहिल्या सेटमध्ये पूर्णपणे वर्चस्व राखले होते. तिने सुरवातीलाच मिळालेली आघाडी कायम ठेवत हा सेट बिंगजियाओला कोणतीही संधी न देता २१-११ अशा फरकाने जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये मात्र बिंगजियाओने चांगले पुनरागमन करत सिंधूला चांगली लढत दिली. या सेटमध्ये सिंधूला पिछाडीवर ठेवण्यात तिला यश मिळाले. अखेर बिंगजियाओने १६-२१ अशा फरकाने दुसरा सेट जिंकून सामन्यात बरोबरी केली.
१ तास ४ मिनिटे चाललेल्या या लढतीत सिंधूने हार न मानता तिसऱ्या सेटमध्ये खेळ उंचावला बिंगजियाओही तिला अटीतटीची लढत देत होती. पण अखेर सिंधूने हा सेट २१-१८ अशा फरकाने जिंकून सामना आपल्या नावावर करत स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.