अहमदाबाद आणि लखनऊ या २ नव्या फ्रँचायझींच्या (संघ) येण्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ चा रोमांच आणखीनच वाढला आहे. लवकरच या येत्या हंगामाचा मेगा लिलावही पार पडणार आहे. तत्पूर्वी आयपीएल कमिटीच्या नियमांनुसार, आधीपासूनच आयपीएलचा भाग असलेल्या ८ संघांना त्यांचे प्रत्येकी ४ खेळाडू संघात कायम ठेवण्याची (रिटेन) संधी असेल. तर नव्या २ संघांना लिलावापूर्वी प्रत्येकी ३ खेळाडू संघात सहभागी करता येतील. सर्व संघांना ३० नोव्हेंबरपर्यंत रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे.
तत्पूर्वी मोठे वृत्त पुढे येत आहे की, पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयकडे नवा संघ लखनऊची तक्रार केली आहे.
लखनऊ संघ पंजाबचा कर्णधार केएल राहुल आणि हैदराबादचा हुकुमी फिरकीपटू राशिद खान यांना त्यांचा संघ सोडून आपल्या संघात सहभागी होण्यासाठी दबाव आणत आहे. याच कारणास्तव या संघांनी हे पाऊल उचलले आहे.
लखनऊ संघामुळे राहुल, राशिदने सोडली त्यांच्या संघांनी साथ!
गेल्या २ हंगामांपासून पंजाबचे नेतृत्वपद सांभाळत असलेल्या स्टार फलंदाज केएल राहुल याने आयपीएल २०२२ मध्ये आपल्या या संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तो आयपीएल २०२२ साठीच्या मेगा लिलावात उतरला आहे. पंजाब संघाच्या खराब प्रदर्शनामुळे आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्याने सांगितले आहे. दुसरीकडे हैदराबाद संघाचा मातब्बर फिरकी गोलंदाज राशिदनेही लिलावात उतरण्याची इच्छा जाहीर केली आहे.
परंतु पंजाब आणि हैदराबाद संघांचे असे म्हणणे आहे की, राहुल आणि राशिदने आपल्या या संघांची साथ सोडण्यामागे लखनऊ संघाचा हात आहे. मेगा लिलावापूर्वी हा संघ या प्रतिभावान खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
मात्र इनसाइड स्पोर्टने दिलेल्या वृत्तानुसार, अद्याप बीसीसीआयला यासंबंधी कसलीही लिखित तक्रार मिळालेली नाही. या प्रकरणावर बोलताना बीसीसीआयचे एक वरिष्ठ अधिकारी इनसाइड स्पोर्ट्सला म्हणाले की, “आम्हाला यासंबंधी कसलीही लिखित तक्रार मिळालेली नाही. परंतु २ फ्रँचायझींनी मौखिक स्वरुपात आमच्याकडे लखनऊ संघाची तक्रार केली आहे. लखनऊ संघ त्यांच्या खेळाडूंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. जर हे प्रकरण खरे निघाले तर, आम्ही योग्य ते पाऊलही उचलू. आम्ही आयपीएलच्या ताळमेळाला अजिबात बिघडवू इच्छित नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
सारा तेंडुलकरने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसणारा वनराज झवेरी आहे तरी कोण? घ्या जाणून
Video: शार्दुल ठाकूरने मुंबईत उरकला साखरपुडा, पाहा कोण आहे त्याची होणारी बायको
पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज