जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीनंतर भारतातील देशांतर्गत क्रिकेटला मोठा फटका बसला होता. अनेक नियमांची बंधने घालत आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू झाले होते. परंतु, बऱ्याच कालावधीनंतर देशांतर्गत क्रिकेटला सुरुवात करण्यात आलेली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एका वर्षाच्या कालावधीनंतर यावर्षी रणजी ट्रॉफीचे आयोजन केले. त्यापाठोपाठ आता बीसीसीआय आणखी दोन मोठ्या देशांतर्गत स्पर्धा म्हणजेच दुलीप ट्रॉफी आणि इराणी चषक पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे.
गुरुवारी (२१ जुलै) बीसीसीआयची वार्षिक बैठक पार पडली. यामध्ये काही महत्त्वाच्या निर्णयांवर विचार केला गेला. त्यापैकी एक म्हणजे देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम सुरू करण्याविषयी देखील चर्चा झाली. बीसीसीआयला कोविड-१९ या साथीच्या आजारामुळे २०२० मध्ये प्रथमच रणजी हंगाम रद्द करावा लागला होता. बीसीसीआयने मागील रणजी हंगामाचा कालावधीही कमी केलेला. तसेच दुलीप ट्रॉफी आणि इराणी चषकाचे तीन हंगाम आयोजित केले गेले नाहीत. या सर्व बाबतीत बोलताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पुढील वर्षी संपूर्ण देशांतर्गत हंगाम खेळवला जाईल असे सांगितले.
असे होईल आयोजन
आठ सप्टेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या दुलीप ट्रॉफीने पुरुषांच्या हंगामाची सुरुवात करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. यासोबतच बीसीसीआय १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान इराणी चषक आयोजित करण्याचा विचार करत आहे. यापूर्वी दुलीप ट्रॉफी पाच विभागांमध्ये बाद पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. परंतु, नंतर ही स्पर्धा तीन संघांची बनवली गेली. ज्यामध्ये अव्वल दोन संघ राऊंड-रॉबिन स्वरूपाच्या आधारे अंतिम फेरीत पोहोचतील. इराणी चषकात सध्याच्या रणजी विजेत्या मध्य प्रदेशचा सामना शेष भारत संघाशी होईल. याबरोबरच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफीच्या कार्यक्रमाबाबतही चर्चा झाली.
महत्त्वाच्या बातम्या –
‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!’ राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होण्यामागे आयसीसीची मोठी रणनिती
‘वनडे क्रिकेट बंद करून टाका…’, माजी पाकिस्तानी दिग्गजाच्या सल्ल्याने उडाली खळबळ






