भारतीय संघ उद्यापासून बांगलागदेशसोबत घरच्या मैदानावर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील झाली आहे. दोन्ही संघातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर रंगणार आहे, तर दुसरा कसोटी सामना कानपूरच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या मालिकेत दोन्ही संघातील अनेक मोठे स्टार्स एकमेकांशी भिडताना दिसणार आहेत. या बातमीद्वारे आपण टॉप-5 खेळाडूंच्या लढतीबद्दल जाणून घेऊया.
विराट कोहली विरुद्ध शकीब अल हसन- विराट कोहली (Virat Kohli) आणि शकिब अल हसन (Shakib Al Hasan) हे दोन्ही आपापल्या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडू नेहमीच 100 टक्के देण्यासाठी ओळखले जातात. जेव्हा-जेव्हा शाकिब आणि विराट मैदानावर आमने-सामने येतात तेव्हा स्पर्धा खूपच चुरशीची लढत पाहायला मिळत असते.
जसप्रीत विरुद्ध नजमुल हसन शांतो- जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) विरुद्ध शांतो यांच्यातील सामना पाहण्यासारखा असेल. शांतो हा बांगलादेश संघातील टॉप ऑर्डरमधील महत्त्वाचा फलंदाज आहे. दुसरीकडे, नुकत्याच खेळल्या गेलेल्या 6 कसोटी सामन्यांमध्ये बुमराहने 31 विकेट्स घेतल्या आहेत.
रविचंद्रन अश्विन विरुद्ध मुशफिकुर रहीम- अश्विन आणि मुशफिकुर रहीम यांच्यात आणखी एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल. अश्विनने त्याच्या शेवटच्या 8 कसोटी सामन्यांमध्ये 42 विकेट्स घेतल्या आहेत. तर रहीमनेही इतक्याच सामन्यांमध्ये 50.54च्या सरासरीने धावा केल्या आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत रहीमने शानदार फलंदाजी केली.
रिषभ पंत विरुद्ध मेहंदी हसन मिराज- बांगलादेशचा फिरकी गोलंदाज मेहदी हसन मिराजने गेल्या 8 कसोटी सामन्यांमध्ये 37 विकेट्स घेतल्या आहेत. भारताविरुद्ध त्याची कामगिरी उत्कृष्ट आहे. पाकिस्तानविरुद्धही तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. अशा स्थितीत प्रदीर्घ काळानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा भारताचा डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि मिराज यांच्यातील लढतही अटीतटीची पाहायला मिळू शकते.
रोहित शर्मा विरुद्ध नाहिद राणा- भारतीय कर्णधार रोहित शर्माने गेल्या 10 कसोटी सामन्यांमध्ये त्याने सुमारे 45च्या सरासरीने फलंदाजी केली आहे. रोहितची फलंदाजीची शैलीही आक्रमक आहे. सध्या बांगलादेशच्या नाहिद राणाची मोठी चर्चा आहे. त्याच्या तडफदारपणाचा विरोधकांवर प्रभाव पडला आहे. 150चा ताशी वेग कोणत्याही खेळपट्टीवर फलंदाजांना अस्वस्थ करतो. हा युवा गोलंदाज आणि भारताचा दिग्गज फलंदाज यांच्यातील सामनाही अटीतटीचा पाहायला मिळू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN: पहिल्या सामन्यात संधी कोणाला पंत की जुरेल? प्रशिक्षकाने थेटच सांगितले
‘या’ 3 स्टार महिला क्रिकेटर आपल्या सौंदर्याने सोशल मीडियावर खूप लोकप्रिय!
6 विकेट घेताच जडेजाच्या नावे होणार अनोखा रेकॉर्ड, केवळ 2 भारतीयांनी केली ही कामगिरी