मुंबई। गुरुवारी (२१ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात ३३ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. हे दोन संघ आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे जेव्हाही या संघांत सामना होतो, तेव्हा रोमांच पाहायला मिळतो. पण असे असले तरी दोन्ही संघांतील काही खेळाडूंमध्ये चांगली मैत्री असल्याचेही पाहायला मिळाले आहे. यात ड्वेन ब्रावो आणि कायरन पोलार्ड यांचा समावेश आहे. त्यांच्यात किती खास मैत्री आहे, हे देखील गुरुवारी सामन्यापूर्वी पाहायला मिळाले.
बुधवारी (२० एप्रिल) पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर दुसऱ्यादिवशी चेन्नई-मुंबई सामन्यापूर्वी (CSK vs MI) त्याला चेन्नईकडून खेळणारा अष्टपैलू ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) भेटला. यावेळी ब्रावोने थेट पोलार्डचे (Kieron Pollard) पाय धरले. ते पाहून पोलार्डने त्याची गळाभेट घेतली आणि नंतर हे दोन्ही क्रिकेटपटू एकमेकांबरोबर हसून चर्चा करताना दिसून आले.
खरंतर ब्रावोपेक्षा पोलार्ड लहान आहे, पण या दोन्ही वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंमध्ये चांगली मैत्री आहे. विशेष म्हणजे ही गोष्ट अनेकांना माहित नाही की, ब्रावोचे आयपीएल पदार्पण मुंबई इंडियन्सकडून झाले होते. तसेच त्यानेच २००९ मध्ये पोलार्डसाठी मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटकडे शिफारस केली होती. त्याची ही शिफारस ऐकून मुंबईने पोलार्डला आपल्या संघात घेतले. तेव्हापासून पोलार्ड मुंबई इंडियन्सचा नियमित सदस्य बनला. तर नंतर ब्रावो चेन्नई संघात दाखल झाला.
महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वीच पंजाब किंग्सचा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सने असेच सचिन तेंडुलकरचे पाय धरले होते. तो व्हिडिओ देखील खूप व्हायरल झाला होता (Dwayne Bravo touches Kieron Pollard’s feet).
https://twitter.com/SlipDiving/status/1517135956762980352
सामन्यादरम्यानही दिसली पोलार्ड-ब्रावोची मैत्री
गुरुवारच्या सामन्यादरम्यान एका क्षणी जेव्हा ब्रावो गोलंदाजी करत होता आणि पोलार्ड फलंदाजी करत होता, तेव्हा पोलार्डने एक चेंडू बचावात्मक खेळला. तो चेंडू लगेचच ब्रावोने पकडला आणि जोरात पोलार्डकडे फेकला. पोलार्डनेही तो चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या बॅटवर चेंडू आला नाही. यानंतर पोलार्डने जाऊन ब्रावोच्या डोक्यावर किस केले.
The bond between DJ Bravo and Kieron Pollard is special. https://t.co/pxg4so0ssq
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 21, 2022
चेन्नईने जिंकला रोमांचक सामना
गुरुवारी झालेल्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १५५ धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्माने नाबाद ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच सूर्यकुमारने ३२ धावा केल्या. तसेच चेन्नईकडून मुकेश चौधरीने १९ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर मैदानात उतरलेल्या चेन्नईकडून अंबाती रायुडूने ४० धावांची आणि रॉबिन उथप्पाने ३० धावांची खेळी केली. तसेच अखेरीस ड्वेन प्रीटोरियसने २२ आणि धोनीने नाबाद २८ धावा करत चेन्नईला विजयापर्यंत पोहचवले. अखेरच्या षटकांत चेन्नईला विजयासाठी १७ धावांची गरज होती. यावेळी एकट्या धोनीनेच त्यातील १६ धावा काढत चेन्नईला विजय मिळवून दिला. मुंबईकडून डॅनिएल सॅम्सने ४ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी
‘फिनिशर’ धोनीवर कौतुकाचा वर्षाव! हा दिग्गज तर म्हणतोय, ‘टी२० विश्वचषकासाठी निवृत्तीतून बाहेर ये’
‘तू पहिल्यांदा फलंदाजी म्हणाला ना’, जेव्हा रोहितने टॉसवेळी घेतली जडेजाची फिरकी