महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये मंगळवारी (17 जून) दुपारी महत्त्वाचा सामना खेळला गेला. रत्नागिरी जेट्स विरुद्ध पुणेरी बाप्पा यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात पुणेरी बाप्पाने पाच गडी राखून विजय मिळवला. या विजयासह पुणेरी बाप्पा प्ले ऑफ्समधील आपले स्थान पक्के करण्यात यशस्वी ठरले. ईगल नाशिक टायटन्स संघाने यापूर्वीच प्ले ऑफ्समधील आपली जागा निश्चित केली आहे.
दुपारच्या सत्रात झालेल्या रत्नागिरी संघाने पुणेरी बाप्पाला चांगलीच झुंज दिली. पुणे संघाला केवळ एक चेंडू राखून विजय मिळवता आला. मात्र, या विजयानंतर त्यांचे 11 गुण झाले. आता नऊ सामन्यात 11 गुण मिळवून ते प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरले. तर, ईगल नाशिक टायटन्स यापूर्वीच आठ सामन्यात 12 गुण मिळवून प्ले ऑफ्समध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ सलग तिसऱ्या वर्षी प्ले ऑफ्स खेळतील. ईगल नाशिक टायटन्सने पहिल्या वर्षी चौथ्या, तर दुसऱ्या वर्षी दुसऱ्या स्थानावर स्पर्धा संपवली होती. तर, पुणेरी बाप्पाला दोन्ही वर्षी तिसऱ्या क्रमांकावर स्पर्धा संपवावी लागलेली.
स्पर्धेत आता रायगड रॉयल्स अधिकाधिक 13 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. तर, कोल्हापूर टस्कर्सला 11 गुणांपर्यंत जाण्याची संधी असेल. सलग दोन विजेतेपद पटकावलेल्या रत्नागिरी जेट्सची मजल यंदा केवळ 8 गुणांपर्यंत जाऊ शकते. तर, स्पर्धेत प्रथमच खेळत असलेल्या सातारा वॉरियर्सला 11 गुणांपर्यंत पोहोचता येईल. असे असले तरी, स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये काट्याची लढत पाहायला मिळू शकते.
स्पर्धेतील क्वालिफायर एक व एलिमिनेटर सामना 20 जून रोजी खेळले जातील. तर, क्वालिफायर 2 सामना दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 जून रोजी होईल. स्पर्धेचा अंतिम सामना 22 जून रोजी होणार आहे. हे सर्व सामने पुण्याजवळील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळले जातील. हे सर्व सामने जिओ हॉटस्टार व स्टार स्पोर्ट्स हिंदी 2 येथे पाहता येतील.






