भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली शुन्य धावेवर बाद झाला. एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात संघाला गरज असतानाचा कर्णधाराने पाचव्याच चेंडूवर एकही धाव न करता तंबूचा रस्ता धरला. आपल्या ८९ कसोटी सामन्यांच्या कसोटी कारकिर्दीत त्याची ही अकराव्यांदा शून्यावर बाद होण्याची वेळ आहे. विशेष म्हणजे या दरम्यान प्रत्येक वेळी त्याला वेगवेगळ्या गोलंदाजाने बाद केले आहेत.
या गोलंदाजांनी केले बाद
आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज अशी ख्याती मिळवणारा विराट इंग्लंड विरुद्ध शनिवारपासून (१३ फेब्रुवारी) सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोईन अलीच्या चेंडूवर खातेही न खोलता शून्यावर तंबूत परतला. यावेळी तो फक्त पाच चेंडूंचा सामना करू शकला. विराट कोहलीला आपल्या कसोटी कारकीर्दीत आत्तापर्यंत अकरा वेळा खाते खोलता आले नाही. विशेष म्हणजे या अकराही वेळी ११ वेगवेगळे गोलंदाज गोलंदाजी करत होते.
या अकरा गोलंदाजांमध्ये सर्वाधिक चार गोलंदाज हे इंग्लंडचे आहेत. त्यामध्ये इंग्लंडची दिग्गज वेगवान दुकली जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांचा समावेश आहे. तसेच लियाम प्लंकेट व मोईन अली यांनी देखील त्याला शून्यावर बाद केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या बेन हिल्फेनहॉस, पॅट कमिन्स व मिचेल स्टार्क यांनी त्याला कसोटीच्या डावात खाते खोलू दिले नाही. इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसह वेस्ट इंडीजच्या रवी रामपॉल व केमार रोच यांनी देखील त्याला शून्यावर बाद करण्याची कामगिरी केली आहे.
याव्यतिरिक्त श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल व बांगलादेशचा युवा वेगवान गोलंदाज अबु जायेद यांनी देखील विराटला कसोटीच्या एका डावात शुन्य धावेवर असताना तंबूचा रस्ता धरण्यास भाग पाडले आहे. विशेष म्हणजे या सर्वांमध्ये फक्त मोइन अली एकटाच फिरकीपटू आहे.
दुसऱ्या कसोटीत भारत भक्कम स्थितीत
चेन्नई येथे सुरू झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ सुस्थितीत आला आहे. युवा सलामीवीर शुबमन गिल शून्यावर बाद झाल्यानंतर अनुभवी चेतेश्वर पुजारा रोहित शर्मा यांनी भारताचा डाव सावरला. मात्र, पुजारा व कर्णधार कोहली लागोपाठ बाद झाल्याने भारतीय संघावर दडपण आले.
परंतु, त्यानंतर रोहित शर्मा व उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी किल्ला लढवत १६२ धावांची दिडशतकी भागीदारी केली. यादरम्यान, रोहितने १६१ धावांची खेळी केली. तर रहाणेने ६७ धावा केल्या. पहिल्या दिवसाखेर भारताने ८८ षटकात ६ बाद ३०० धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
Valentines Week Special : ५ वर्षे भारताच्या स्टार खेळाडूच्या अफेअरची कुणालाच नव्हती माहिती






