आयपीएलच्या 17 व्या हंगामाची ट्राॅफी कोलकाता नाईट रायडर्सनं आपल्या नावे केली आहे. केकेआरनं अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादला 8 विकेट्सनं धूळ चारत आयपीएल 2024 चा खिताब जिंकला.
या हंगामात अनेक नव्या खेळाडूंनी चांगली प्रतिभा दाखवली आहे. काही युवा खेळाडूंनी फलंदाजीत, तर काहींनी गोलंदाजीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. विराट कोहली पासून हर्षल पटेल आणि सुनील नारायण पर्यंत अनेक खेळाडूंनी या मोसमात पुरस्कार जिंकले आहेत. चला तर मग जाणून घेऊया आयपीएल 2024 मध्ये कोण-कोणत्या खेळाडूंना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
विजेता संघ: आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करून ट्रॉफी जिंकली. केकेआरला चॅम्पियन बनल्यानंतर 20 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं आहे.
उपविजेता संघ: सनरायझर्स हैदराबाद आयपीएल 2024 चा उपविजेता संघ ठरला. संघानं साखळी सामन्यात अनेक मोठे विक्रम केले होते. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील एसआरएचला उपविजेतेपदासाठी 12.5 कोटी रुपये मिळाले आहेत.
सर्वात मौल्यवान खेळाडू: सुनील नारायणला आयपीएल 2024 मध्ये सर्वात मौल्यवान खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. कोलकाता नाईट रायडर्ससाठी मोसमाच्या सुरुवातीपासून नारायण हा सर्वात महत्त्वाचा खेळाडू राहिला. त्यानं फलंदाजीत 488 धावा केल्या आणि गोलंदाजीत 17 बळी घेतले. या कामगिरीमुळे नारायण मोसमातील सर्वात मौल्यवान खेळाडू ठरला. यासाठी त्याला 10 लाख रुपये आणि ट्रॉफी मिळाली.
उदयोन्मुख खेळाडू: सनरायझर्स हैदराबादचा 21 वर्षीय अष्टपैलू नितीश रेड्डीला आयपीएल 2024 चा ‘इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन’ पुरस्कार मिळाला आहे. रेड्डीनं हंगामात 13 सामन्यात 33.67 च्या सरासरीने 303 धावा केल्या, आणि गोलंदाजीत 3 बळीही घेतले. नितीशने त्याच्या पहिल्याच हंगामात हा पुरस्कार जिंकला, यासाठी त्याला 10 लाख रुपये मिळाले आहेत.
स्ट्रायकर ऑफ द सीझन: ‘स्ट्रायकर ऑफ द सीझन’ पुरस्कार दिल्ली कॅपिटल्सचा 22 वर्षीय विस्फोटक फलंदाज जेक फ्रेझर मॅकगर्कला देण्यात आला. मॅकगर्कने आयपीएल 2024 मध्ये 9 सामन्यात 330 धावा केल्या. ज्यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 234 एवढा राहिला. या कामगिरीसाठी त्याला ‘स्ट्रायकर ऑफ द सीझन’चा पुरस्कार देण्यात आला. मॅकगर्कला पुरस्कार म्हणून 10 लाख रुपये मिळाले आहेत.
सुपर सिक्स ऑफ द सीझन: सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माने आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. अभिषेकने या हंगामात 42 षटकार मारले, ज्यासाठी त्याला ‘सुपर सिक्स ऑफ द सीझन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याला 10 लाख रुपयांचं बक्षीस मिळालं.
कॅच ऑफ द सीझन: ‘कॅच ऑफ द सीझन’चा पुरस्कार केकेआरच्या रमणदीप सिंगला मिळाला. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात रमणदीपने अर्शिन कुलकर्णीचा उत्कृष्ट झेल घेतला होता.
ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप – आयपीएल 2024 ची ऑरेंज कॅप विराट कोहलीला (741 धावा) तर पर्पल कॅप हर्षल पटेलनं (24 विकेट) जिंकली. दोघांनाही 10-10 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले.
महत्त्वाच्या बातम्या –
सुनील नारायण IPL 2024 चा सर्वात मौल्यवान खेळाडू! तिसऱ्यांदा पुरस्कार जिंकून रचला इतिहास