इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना लॉर्ड्सवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. पावसामुळे सामना 39-39 षटकांचा करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 39 षटकांत 5 गडी गमावून 312 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 24.4 षटकांत केवळ 126 धावांत गडगडला. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकला त्याच्या जबरदस्त खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
तत्तपूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. इंग्लंडकडून बरीच आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. सलामीवीर फिल सॉल्टने 27 चेंडूत 22 धावा केल्या. याशिवाय बेन डकेटने 62 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 63 धावांची खेळी केली. कर्णधार हॅरी ब्रूकने मधल्या फळीत चमकदार फलंदाजी केली. त्याने 58 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 87 धावा केल्या. याशिवाय जेमी स्मिथने 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 39 धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोनने खालच्या फळीत तुफानी फलंदाजी केली. त्याने 27 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 62 धावा केल्या. डावाच्या शेवटच्या षटकात लियाम लिव्हिंगस्टोनने मिचेल स्टार्कच्या एकाच षटकात 28 धावा खेचल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली होती. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि कर्णधार मिचेल मार्श या जोडीने पहिल्या विकेटसाठी 8.4 षटकांत 68 धावांची भागीदारी केली. मार्शने 34 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 28 धावा केल्या. तर ट्रॅव्हिस हेडने 23 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 34 धावांची खेळी केली. मात्र, यानंतर डाव गडगडला. संघाची मधली आणि खालची फळी पूर्णपणे फ्लॉप ठरली. इंग्लंडकडून मॅथ्यू पॉट्सने 4 आणि ब्रेडन कार्सने 3 विकेट घेत कांगारुंचा डाव लवकरच गुंडाळला. आता 5 सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत आहे.
हेही वाचा-
IND vs BAN: रोहित शर्माच्या निर्णयाने इतिहास बदलला, 60 वर्षांचा सिलसिला तुटला
24.75 कोटींचा ताप उतरला, पंजाबच्या फलंदाजाने स्टार्कला धो धो धुतले, कांगारू गोलंदाजाचा लाजिरवाणा विक्रम
IND vs BAN; दुसऱ्या दिवशीही पाऊस पडणार का? काय आहे हवामान अंदाज?