ऍजबस्टन कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताला ७ विकेट्स राखून पराभूत केले. सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाला अजून एक वाईट बातमी मिळाली. आयसीसीने भारतीय संघावर षटकांची गती कमी राखल्यामुळे मोठा कारवाई केली आहे. संघ अपेक्षित षटकांपेक्षा २ षटके मागे खेळत होता. संघावर दंडाच्या स्वरूपात आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील दोन गुण कापले गेले आहे. तसेच खेळाडूंच्या मॅच फीसच्या ४० टक्के रक्कम कापली गेली आहे.
आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालीकेतील २ गुण कापले गेल्यानंतर भारतीय संघाला पाकिस्तानने मागे टाकले आहे. पाकिस्तानकडे एकूण ४४ गुण आहेत आणि त्यांची जिंकण्याची सरासरी ५२.३८ आहे. भारतीय संघाचा विचार केला, तर त्यांच्याकडे ७५ गुण आहेत आणि जिंकण्याची सरासरी ५२.०८ आहे.
सामन्याचे रेफरी डेविड बून यांनी भारतीय संघावर ही कारवाई केली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चालू हंगामातील ही तिसरी वेळ आहे, जेव्हा भारतीय संघावर अशा प्रकारची कारवाई केली गेली आहे. यापूर्वी भारतीय संघाला नॉटिंघम कसोटी सामन्यात दोन, तर सेंचुरीयनमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात एका गुणाचे नुकसान झाले होते. आयसीसीच्या आचार संहितेनुसार स्लो ओव्हर रेटची कारवाई करायची झाल्यास, प्रत्येक षटकासाठी संघाचा एक गुण कापला जातो.